पुणे: कसबा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार गणेश भोकरे यांनी लालबत्ती परिसरातील देवदासी महिलांसमवेत भाऊबीज साजरी केली. समाजातील सर्व घटकांना आपलेसे करण्यावर भोकरे यांनी भर दिला आहे. या सर्व महिलांनी विजयाचा आशिर्वाद देत भाऊबीजेची ओवाळणी दिली.
कसबा मतदारसंघात प्रचाराची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. भारतीय जनता पक्ष व काँग्रेस या प्रस्थापित दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना भोकरे यांनी घाम फोडला आहे. त्यातच राज ठाकरे यांच्या सभेने कसब्यातील वातावरण ढवळून निघाले असून, यंदा गणेश भोकरे जायंट किलर ठरतील, असे चित्र निर्माण झाले आहे.
मतदारसंघातील कोपरा न कोपरा, घर घर पिंजून काढत भोकरे अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. कार्यकर्त्यांची मोठी फौज त्यांच्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहे. मध्यवर्ती पेठांमध्ये, पुण्याच्या पूर्व भागात जात तेथील समस्या समजून घेत त्या सोडविण्यासाठी भोकरे आपले व्हिजन सर्वांसमोर मांडत आहेत. त्यामुळे सर्वांचा त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
गणेश भोकरे म्हणाले, “या माता-भगिनींच्या आनंदात सहभागी झालो. त्यांचा आशिर्वाद व शुभेच्छा माझ्यासाठी उत्साह वाढवणार्या आहेत. समाजातील सर्व घटकांना, जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाण्याची, सर्वांच्या विकासासाठी काम करण्याची शिकवण राजसाहेब ठाकरे यांची आहे. कसबाचे वैभव परत मिळविण्यासाठी, कसबाला वाहतुककोंडी, गुन्हेगारी मुक्त बनवण्यासाठी, जुन्या वाड्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी मला निवडून द्यावे, अशी साद घालत आहे.”

 
                     
             
                                         
                                         
                                         
                                                 
                                                 
                                                