आचार्य डॉ. लोकेश मुनीजी – आदर्श व्यक्तिमत्त्वांच्या सन्मानातून नवी पिढी घडेल

आचार्य डॉ. लोकेश मुनीजी – आदर्श व्यक्तिमत्त्वांच्या सन्मानातून नवी पिढी घडेल

आदर्श व्यक्तिमत्त्वांच्या सन्मानातून नवी पिढी घडेल: आचार्य डॉ. लोकेश मुनीजी
बन्सी-रत्न वेल्फेअर ट्रस्टतर्फे ऍड. एस. के. जैन कुटुंबास ‘आदर्श परिवार’, लुंकड दाम्पत्यास ‘आदर्श माता-पिता राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान
 
पुणे : “आई वडिलांचे संस्कार, त्याग, समर्पण यातून आपली जडणघडण होते. त्यांचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही. त्यांच्या ऋणात राहण्यातच खरा आनंद आहे. आपल्या मातापित्याचा, समाजाचा विसर पडू न देता चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याचा सुषमा व संजय चोरडिया यांनी घेतेलेला वसा कौतुकास्पद आहे,” असे मत प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलशेठ मणियार यांनी केले.
 
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित बन्सी-रत्न चॅरिटेबल वेल्फेअर ट्रस्टतर्फे रतनबाई व बन्सीलाल चोरडिया यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण नुकतेच झाले. ऍड. एस. के जैन व कुटुंबियांना पहिला ‘बन्सी-रत्न आदर्श परिवार राष्ट्रीय पुरस्कार’, तर आशाबाई व रमणलाल लुंकड दाम्पत्यास ‘बन्सी-रत्न आदर्श माता-पिता राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. शोभा धारिवाल यांना ‘समाजरत्न’, पोपटलाल ओस्तवाल यांना ‘समाज शिरोमणी’, सुभाष ललवाणी यांना ‘समाजभूषण’, माणिक दुग्गड यांना ‘गुरुसेवा’ व शेखर मुंदडा यांना ‘मानवसेवा’ राष्ट्रीय पुरस्कार-२०२४ प्रदान करण्यात आला.  पुरस्काराचे हे सातवे वर्ष होते. यावेळी जैन समाजातील दहावी व बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांना गुणवत्तेचे प्रमाणपत्र, सुवर्णपदक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
बिबवेवाडी येथील श्री वर्धमान श्वेतांबर स्थानकावासी जैन श्रावक संघामध्ये झालेल्या कार्यक्रमात आचार्य डॉ. लोकेश मुनीजी होते. एअरमार्शल भूषण गोखले, संगीतकार अबू मलिक, बी. के. दशरथ भाई, ट्रस्टचे संस्थापक प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व उपाध्यक्ष सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, डॉ. किमया गांधी, सिद्धांत चोरडिया, अक्षित कुशल, प्रशांत पितालिया, अजित शिंदे आदी उपस्थित होते.
 
आचार्य डॉ. लोकेश मुनीजी म्हणाले, “इथे सन्मानित प्रत्येक व्यक्तीने समाजात एक वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. भारतीय संस्कृती सेवा, त्याग व समर्पणाची आहे. अशा आदर्श व्यक्तिमत्वाचा सन्मान करून नव्या पिढीला घडविण्याचे काम संजय व सुषमा चोरडिया करत आहेत.”
 
एअरमार्शल भूषण गोखले म्हणाले, “समाज आणि राष्ट्रासाठी समर्पित भावनेने काम करणाऱ्या लोकांची आज गरज आहे. चांगले काम करणाऱ्या लोकांना विद्यार्थ्यांसमोर आणून त्यांना सन्मानित केल्याने चांगल्या पिढीचे निर्माण होण्यास मदत होईल.”
 
शोभा धारीवाल, ऍड. एस. के. जैन यांनी भावना व्यक्त केल्या. प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी प्रास्ताविक केले. मनीषा कर्नावट व प्रशांत पितालिया यांनी सूत्रसंचालन केले. सुषमा चोरडिया यांनी आभार मानले. अबू मलिक व सहकाऱ्यांच्या गायन मैफल सादर केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *