चांगल्या शिक्षणानेच आर्थिक, सामाजिक स्थिती बदलेल
सुनील फुलारी यांचा बांधकाम मजुरांच्या मुलांना सल्ला; ‘बीएआय’र्फे गुणवंत मुलांचा सत्कार
पुणे : “बांधकाम मजुरांची आर्थिक स्थिती हलाखीची असते. त्यातूनही अनेक पालक मुलांना शिकवण्याची धडपड करतात. त्यामुळे शिक्षणाची संधी मिळालेल्या मुलांनी चांगले शिक्षण घेऊन स्वतःची व कुटुंबाची परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करावेत. चांगले शिक्षण घेऊन करिअर घडवले, तर आर्थिक व सामाजिक स्थिती बदलेल,” असा सल्ला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी बांधकाम मजुरांच्या मुलांना दिला.
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय) पुणे सेंटरच्या वतीने बांधकाम मजुरांच्या गुणवंत मुलांच्या सत्कार सोहळ्यात सुनील फुलारी बोलत होते. शनिवार पेठेतील विष्णुकृपा सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ‘बीएआय’च्या पश्चिम विभागाचे माजी उपाध्यक्ष रणजित मोरे, ‘बीआयए’ पुणे सेंटरचे चेअरमन सुनील मते, व्हाईस चेअरमन अजय गुजर, मानद सचिव राजाराम हजारे, खजिनदार शशिकांत किल्लेदारपाटील, कार्यक्रमाचे समन्वयक करण पवार उपस्थित होते. जवळपास १०० मुला-मुलींना शैक्षणिक साहित्य व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सुनील फुलारी म्हणाले, “बांधकाम मजुर व त्यांच्या मुलांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. असोसिएशनने त्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवायला हवी. या मुलांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करण्याचा हा उपक्रम स्तुत्य आहे. बांधकाम मजुरांप्रती सहानुभूती दाखवायला हवी. मजुरांनी आणि विशेषतः मुला-मुलींनी व्यसनांपासून दूर राहायला हवे. पोलीस भरती, बँक भरती व अन्य क्षेत्रातील करिअरकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. या कामात असोसिएशनने मार्गदर्शकाची भूमिका घ्यावी.”
रणजित मोरे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व पटवून देताना तुम्हाला मिळालेल्या संधीचा लाभ घेऊन स्वतःसह कुटुंबाला प्रगतीपथावर घेऊन जाण्याचे आवाहन केले. बिल्डर्स असोसिएशन बांधकाम मजुरांसाठी राबवत असलेल्या विविध उपक्रमांविषयी त्यांनी सांगितले.
सुनील मते यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. अजय गुजर यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. संजय आपटे यांनी सूत्रसंचालन केले. राजाराम हजारे यांनी आभार मानले.
.

 
                     
             
                                         
                                         
                                         
                                                 
                                                 
                                                