आरोग्य अधिकाऱ्यासाठी युवक काँग्रेसची बॅनरबाजी

आरोग्य अधिकाऱ्यासाठी युवक काँग्रेसची बॅनरबाजी

डॉ. भगवान पवार यांचे निलंबन मागे घ्यावे; युवक काँग्रेसचे रोहन सुरवसे यांची मागणी 

पुणे : महानगरपालिकेतील आरोग्यप्रमुख डॉ. भगवान पवार यांचे निलंबन मंत्र्यांच्या दबावामुळे झाले आहे. मात्र, समस्त पुणेकर नागरिक डॉ. पवार यांच्या पाठीशी असून, त्यांचे निलंबन तात्काळ मागे घ्यावे, अशी मागणी करत युवक काँग्रेसच्या वतीने शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे.

 
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे यांनी आरोग्य खात्याचा व संबंधित मंत्र्यांचा निषेध करत पुणेकर जनता डॉ. पवार यांच्या पाठीशी असल्याचे बॅनर लावले आहेत. तसेच त्यांच्यावरील कारवाई मागे घेऊन त्यांना तात्काळ सेवेत रुजू करून घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
 
रोहन सुरवसे पाटील म्हणाले, “आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप व एका जुन्या तक्रारीला समोर ठेवून पवार यांचे निलंबन करण्यात आले आहे. मात्र, डॉ. पवार यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून निलंबनाच्या कारवाईसंदर्भात काही गंभीर खुलासे केले आहेत. एका मंत्र्याने आपल्याला कात्रज येथील त्यांच्या कार्यालयात बोलावून नियमबाह्य टेंडरची कामे सांगितली. आरोग्य विषयक उपकरणे व इतर खरेदीत घोटाळा करण्याचा दबाव संबंधित मंत्र्याने टाकला. त्याला प्रतिसाद न दिल्याने सूडबुद्धीने निलंबनाची कारवाई केल्याचे डॉ. पवार यांनी या पत्रात म्हटले आहे.”
——————–
डॉ. पवार यांनी केलेले आरोप गंभीर स्वरूपाचे असून, त्यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यावर खोट्या स्वरूपाचे घाणेरडे व गंभीर आरोप करुन त्रास देणाऱ्या संबंधित मंत्र्याचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे. निघेल तिथून पैसा उकळण्याचा प्रयत्न या मुजोर मंत्र्याकडून सुरु आहे. आपल्या कार्यालयात बोलावून अधिकाऱ्यांना दमदाटी करण्याचा प्रकार तालिबानी स्वरूपाचा आहे. डॉ. पवार यांना तात्काळ सेवेत रुजू करून घेतले नाही, तर आरोग्य मंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर युवक काँग्रेस कडून तीव्र आंदोलन करण्यात येईल.
– रोहन सुरवसे-पाटील, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *