आर्थिक क्षेत्राच्या प्रगतीसाठी आशिषकुमार चौहान यांचे मोलाचे योगदान

आर्थिक क्षेत्राच्या प्रगतीसाठी आशिषकुमार चौहान यांचे मोलाचे योगदान

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे गौरवोद्गार; ‘सूर्यदत्त’तर्फे आशिषकुमार चौहान यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार २०२४’ प्रदान

पुणे: नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे (एनएसई) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान यांना आर्थिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनतर्फे ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार २०२४’ प्रदान करण्यात आला. मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आयोजित कार्यक्रमात ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या हस्ते चौहान यांना सन्मानित करण्यात आले.

 
प्रसंगी ‘सूर्यदत्त’चे सल्लागार प्रसन्न पाटील, मुख्य कार्यपालन अधिकारी अक्षित कुशल, अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रतीक्षा वाबळे, संचालक डॉ. मनीषा कुंभार, मयूर शहा, प्रा. विवेक स्वामी, प्रा. शितल भुसारी, प्रा. रागिणी भट, प्रा. आदर्श कातराळे, प्रा. अस्मिता जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
 
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “आशिषकुमार चौहान एक भारतीय व्यावसायिक आणि प्रशासक आहेत. आयआयटी मुंबई आणि आयआयएम कोलकाता येथून शिक्षण पूर्ण केलेले चौहान नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाचे (एनएसई) सहसंस्थापक आहेत. ‘एनएसई’चे स्क्रीन आधारित ट्रेडिंग सेट करण्यात, तसेच निफ्टीचा इंडेक्स तयार करण्यात योगदान दिले आहे. १९९३-२००० या काळात त्यांनी ‘एनएसई’मध्ये केलेल्या कामामुळे त्यांना आधुनिक आर्थिक प्रवाहांचे जनक मानले जाते.”

“आशिषकुमार चौहान यांनी वित्त मंत्रालय, शिक्षण, एमएसएमई, सीबीडीटी तसेच भारतीय रिझर्व्ह बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया यांसारख्या नियामकांसह सरकारच्या अनेक धोरण समित्यांमध्ये काम केले आहे. २० पेक्षा जास्त एक्सचेंजेस असलेल्या साऊथ एशिया फेडरेशन ऑफ एक्सचेंजेसचेही (एसएएफई) त्यांनी नेतृत्व केले. सध्या ते ‘डब्लूएफई’च्या बोर्डाचे सदस्य आहेत. यूएन, डब्ल्यूईएफ, डब्लूएफई, यूएनसीटीएडी, ओईसीडी अशा अनेक बहुपक्षीय संस्थांच्या व्यासपीठावर त्यांनी विचार मांडले आहेत. चौहान यांनी आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय असे योगदान दिले आहे. ‘एनएसई’ची स्थापनेतील त्यांचा सहभाग महत्वपूर्ण आहे,” अशा शब्दांत प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी चौहान यांच्या कार्याचा गौरव केला.

“भारतातील सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी एक असलेल्या अलाहाबाद विद्यापीठाचे कुलपती म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. आयआयएम, एजेएनआयएफएम (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट), एनआयटी आणि आयआयआयटी यासह अनेक प्रसिद्ध सरकारी शैक्षणिक संस्थांच्या मंडळावर ते आहेत. इतर आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये प्रतिष्ठित व्हिजिटिंग फॅकल्टी सदस्य म्हणूनही काम करतात. त्यांनी ‘बीएसई: द टेम्पल ऑफ वेल्थ क्रिएशन’ या पुस्तकाचे सह-लेखन केले आहे. ‘स्थिथप्रज्ञा: द प्रोसेस ऑफ मेंटेनिंग एन इक्विलिब्रियम’ हे त्यांचे आत्मचरित्र आहे. अशा या सर्वगुणसंपन्न व्यक्तीला सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करताना आम्हाला आमचाच सन्मान होत असल्याची भावना आहे,” असे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले. 
आशिषकुमार यांनी हा पुरस्कार स्वीकारताना आनंद होत असल्याचे नम्रपणे नमूद केले. ‘सूर्यदत्त’च्या २५ वर्षांच्या वाटचालीचे कौतुक करत आशिषकुमार चौहान म्हणाले, “विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाचे व जागतिक दर्जाचे शिक्षण देऊन देशाच्या विकासात योगदान देणारी पिढी घडवण्यासाठी ‘सूर्यदत्त’ने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. सूर्यदत्त परिवाराला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो.”
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *