पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी संधी हवी
शिवाजी माधवराव मानकर यांनी भाजप श्रेष्ठींकडे मागितली पुण्यातून लोकसभेची उमेदवारी
पुणे, ता. २६ : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक कल्पना माझ्याकडे आहेत. वाहतुकीची समस्या, सुरळीत पाणीपुरवठा, मेट्रोचा विस्तार, पार्किंग व्यवस्था, औद्योगिक सामाजिक बांधीलकी (सीएसआर) निधीतून शाळांचे सक्षमीकरण, स्वच्छता मोहीम, कौशल्य विकास अशा अनेक गोष्टींवर लोकसहभागातून काम करण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी पुणे लोकसभा मतदार संघातून आपल्याला उमेदवारी मिळावी, अशी इच्छा ‘फ्रेंड्स ऑफ बीजेपी’च्या माध्यमातून काम करणारे शिवाजी माधवराव मानकर यांनी व्यक्त केली.
“भाजपसोबत अनेक वर्षांपासून काम करत आहे. तसेच २०१४ मध्ये भारतीय जनता पक्षाने व देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला ऐनवेळी येवला मतदारसंघातून विधानसभा लढण्याची संधी दिली. कोणतीही पूर्वतयारी नसताना येवल्यात तेव्हा मंत्री छगन भुजबळ यांना तुल्यबळ लढत दिली होती. माझ्यातील लढवय्या नेतृत्व व मला मिळणारा सर्वपक्षीय पाठिंबा यामुळे सर्वच सहा मतदारसंघात आम्हाला मताधिक्य मिळू शकेल. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आपल्याला पुण्याच्या लोकसभेची उमेदवारी देऊन पुणेकरांच्या सेवेची संधी देईल, असा विश्वास वाटतो,” असे मानकर यांनी नमूद केले. “पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यावर, सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासह मेट्रोचा विस्तार, रिंग रोड प्रकल्प पूर्ण होण्यासाठी प्रयत्न, स्वच्छ शहर व महापालिकेच्या शाळांचे सक्षमीकरण, पुण्याचा आत्मा असलेल्या मुळा-मुठा नदीचे संवर्धन, केंद्र शासनाच्या योजनांच्या माध्यमातून महिला, तरुण यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासह इतर अनेक योजनांवर आपण करत आहोत. पुण्यात औद्योगिक कंपन्या मोठ्या प्रमाणात असून, त्यांच्याकडे हजारो कोटींचा सीएसआर निधी उपलब्ध असतो. हा सीएसआर निधी, लोकांचा सहभाग यातून अनेक प्रकल्प व उपक्रम मार्गी लावण्यावर आपला भर असणार आहे,” असे मानकर म्हणाले.