प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे प्रतिपादन; उस्ताद तौफिक कुरेशी व सहकलाकारांना ‘सूर्यभारत राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान
चित्तरंजन वाटिका येथे आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन; स्वरमयी मैफलीत पुणेकर रसिक मंत्रमुग्ध
पुणे : “भारतीय कलांचा प्रसार जगभर होत आहे. भारत महासत्ता होण्याच्या दिशेने पावले टाकत आहे. भारताला विश्वगुरू होण्यासाठी तंत्रज्ञान आणि शिक्षण यासोबतच भारतीय कलेचा आणि संस्कृतीचा देखील विकास होणे आवश्यक आहे”, असे प्रतिपादन सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी केले.
मॉडेल कॉलनीतील चित्तरंजन वाटिका येथे आयोजित केलेल्या ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमावेळी प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया बोलत होते. नवनिर्माण अभियान प्रतिष्ठानतर्फे माजी नगरसेवक राजू उर्फ दत्तात्रय पवार आणि मित्रपरिवाराने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. स्वरमयी मैफलीत पुणेकर रसिक मंत्रमुग्ध झाले. सूर्यदत्त ऍग्रो फुड एंटरप्राईजेसतर्फे (सेफ) कलाकार व श्रोत्यांना पौष्टिक खाऊचे वाटप करण्यात आले. त्यामुळे उपस्थितांमध्ये एक ऊर्जा व उत्साह संचारला होता.
दिवाळी पहाट महोत्सवात पंडित शौनक अभिषेकी, शास्त्रीय गायक निषाद व नौशाद हरलापूर यांचे गायन व बेला शेंडे यांचा लाईव्ह कॉन्सर्टने श्रोत्यांची मने जिंकली. नम्रता गायकवाड यांचे सनई वादन, रूपक कुलकर्णी यांचे बासरी वादन, पंडित हर्षद कानेटकर यांचे तबला वादन झाले. या स्वरमयी दिवाळी पहाट कार्यक्रमाचा शिवाजीनगरसह परि सरातील नागरिकांनी सलग चार दिवस आनंद लुटला.
दिवाळीच्या मंगलमय दिवसाची सुरुवात स्वरमय करणाऱ्या हिंदुस्थानी शास्त्रीय कलाकारांना सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनतर्फे प्रसिद्ध शास्त्रीय कलाकार उस्ताद तौफीक कुरेशी यांना ‘सूर्यभारत राष्ट्रीय पुरस्कार २०२३’, तर शिखरनाद कुरेशी, एस. आकाश आणि शंतनू गोखले यांना ‘सूर्यभारत गौरव पुरस्कार-२०२३’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रसंगी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या उपाध्यक्ष सुषमा चोरडिया आदी उपस्थित होते.