कनेक्टिंग इंडिया ट्रस्टचा पुढाकार; ५०८० व्यक्तींना आत्महत्येच्या विचारापासून केले परावृत्त
पुणे : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई असो की, अभिनेता सुशांत सिंह राजपूत असो की, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असोत, या सगळ्या घटनांतून भावनिक खच्चीकरण आत्महत्येला कारणीभूत असल्याचे दिसते. ती व्यक्ती गेल्यानंतर तणावाच्या काळात भावनिक आधार खूप गरजेचा असल्याची चर्चा होते. हीच बाब लक्षात घेऊन भावनिक ‘कनेक्ट’ साधण्याच्या दृष्टीने कनेक्टिंग इंडिया ट्रस्टने पुढाकार घेतला असून, गेल्या वर्षभरात ५०८० व्यक्तींना आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त केले आहे. यंदाच्या दिवसाची संकल्पना ‘कृतीतून आशेचा किरण’ अशी आहे.
याबाबत बोलताना कनेक्टिंग ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदा खिस्ती म्हणतात, “१० सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस’ म्हणून साजरा होतो. आत्महत्या हा शब्द ऐकला तरी मनामध्ये एक नकारात्मक भावना जागृत होते. एवढ्या-तेवढ्या कारणावरून ‘जीव’ संपवणे चुकीचे आहे. ‘आत्महत्या’ ही कृती आपल्यासाठी निषिद्ध आहे. पण एखादी व्यक्ती अशी टोकाची कृती करते, तेव्हा त्याच्या मनात अनेक प्रकारच्या भावनांचा कल्लोळ सुरु असतो. त्या भावना बऱ्याच वेळा ते कोणाशी मोकळेपणाने बोलू शकत नाहीत. कारण आपल्याला कोणी समजून घेत नाही आणि घेऊ शकणार नाही, अशी भावना मनात असते. या क्षणी अशा व्यक्तीला मदतीचा हात देणारे कोणी हवे असते. कुठलाही सल्ला न देता, कोणतेही मत न बनवता माहिती गोपनिय ठेवत कनेक्टिंग भावनिक आधार देण्याचे काम करते.”
आत्महत्येचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. देशामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या होतात. वर्षात एकूण १ लाख ६४ हजार लोक आत्महत्या करतात. देशात दिवसाला २८ विद्यार्थी आपला जीव देतात. आर्थिक चणचण, नात्यांमधील तणाव, बेबनाव, वाढलेल्या अपेक्षा पूर्ण न होणे, बेरोजगारी आणि अशी अनेक कारणे माणसाला हतबल करत आहेत. त्यातून आलेला एकटेपणा, निराशावाद आणि असहाय्यता आत्महत्येसारखी टोकाची कृती करायला प्रवृत्त करते. अशावेळी दुसऱ्याला पारखणे, सल्लागाराच्या भूमिकेतून बोलणे टाळावे, ताणतणावात विश्वासू व्यक्तीकडून भावनिक आधार घ्यावा. तणावाखालील व्यक्तींना समजून घेत असे काम करणाऱ्या संस्था, गट, व्यक्तिबरोबर जोडून घेत आत्महत्या प्रतिबंधासाठी योगदान द्यावे. आत्महत्येसंबंधी स्वत: जागरुक होत समाजात जागृती निर्माण करण्यासाठी पुढे यावे. आत्महत्येचे विचार मनात घोळत असतील, तर मदत मागावी,” असे आवाहनही त्यांनी केले.
‘कनेक्टींग ट्रस्ट’ ही संस्था एक हेल्पलाइन चालवते. इथे ताणतणाव, भावना व्यक्त करता येतात. इथे कोणीही पारखत नाही, सल्ला देत नाही किंवा माहिती उघड करत नाही. सहभावनेतुन तुम्हाला ऐकले जाते. कोणताही सल्ला दिला जात नाही. मनमोकळेपणाने व्यक्त होता येते. ही हेल्पलाईन सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत मोफत सेवा देते. ९९२२००४३०५ /९९२२००११२२ यावर संपर्क करू शकता. अथवा, distrenmailsconnecting@gmail.com वर लिहून व्यक्त होऊ शकता. प्रत्यक्ष भेटीसाठी ८४८४०३३३१२ वर संपर्क साधून वेळ घेऊ शकता, असे सुखदा खिस्ती यांनी नमूद केले.