पुणे : विधी व न्याय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष व प्रसिद्ध विधिज्ञ ॲड. पांडुरंग थोरवे यांना सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे ‘सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमध्ये संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या हस्ते थोरवे यांना नुकतेच सन्मानित करण्यात आले. प्रसंगी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया, सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलाखा, कार्यकारी विकास अधिकारी इंजि. सिद्धांत चोरडिया, ‘सूर्यदत्त’च्या विधी विभागाच्या केतकी बापट आदी उपस्थित होते.
मालमत्ता, नागरी, दस्तावेज व महसूल या क्षेत्रातील एक नामवंत वकील म्हणून प्रसिद्ध असलेल्या ॲड. पांडुरंग थोरवे यांनी कायद्याच्या अभ्यासाला व कार्याला २००३ मध्ये पुण्यातून सुरवात केली. अनेक महत्त्वाची प्रकरणे त्यांनी हाताळली आहेत. प्रामाणिक व चांगली सेवा आणि योग्य मार्गदर्शन देण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे मोठ्या प्रमाणात अशील त्यांच्याशी जोडले गेले आहेत. फेब्रुवारी २०२२ मध्ये झालेल्या पुणे बार असोसिएशनच्या निवडणुकीत ॲड. पांडुरंग थोरवे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. वकील बांधव व भगिनींसाठी बार आणि बेंच यांच्यातील दुवा साधण्याचे काम ते करत आहेत. आपल्या शांत व सामंजस्य स्वभावाने बार आणि बेंच यांचे कार्य अधिक सुलभ व प्रगत होण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. वकिलांच्या ज्ञानात भर पडावी, यासाठी निवृत्त व कार्यरत न्यायाधीशांचे सेमिनार्स व व्याख्यानमाला आयोजित करण्यात त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यातून नव्याने वकिली क्षेत्रात येत असलेल्या तरुणांना मार्गदर्शन व व्यक्तिमत्व विकासाची संधी मिळत आहे.
‘सूर्यदत्त’सारख्या नामवंत शिक्षण संस्थेकडून मिळालेला हा सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रेरणादायी आहे. प्रत्येक भारतीयाला सन्मानाने जगण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. आपले अधिकार काय आहेत, कायदा कसे काम करतो, हे माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाला कायद्याचे ज्ञान, माहिती असायला हवी. विद्यार्थ्यांनी ते शालेय वयापासूनच आत्मसात करायला हवी, असे मत ॲड. पांडुरंग थोरवे यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केले.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “वकील म्हणून ॲड. पांडुरंग थोरवे यांचा उल्लेखनीय आणि दीर्घकाळचा प्रवास ओळखताना व त्यांचा सन्मान करताना आम्हाला आनंद होत आहे. शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील समन्वयावर ‘सूर्यदत्त’मध्ये अधिक भर दिला जात असून, त्यातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष काम करणाऱ्या तज्ज्ञ लोकांकडून मार्गदर्शन मिळते. त्यातून विद्यार्थ्यांना आवश्यक व नव्या कौशल्याना आत्मसात करता येते. थोरवे यांनी कायद्याविषयी केलेल्या मार्गदर्शनाचा आमच्या विदयार्थ्यांना फायदा होईल. थोरवे यांच्यासारख्या समविचारी लोकांना सोबत घेऊन ‘सूर्यदत्त’चा विधी विभाग कायदा अभ्यासाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल.”