पुणे : “दिव्यांगांना अद्भुत ईश्वरी शक्ती लाभलेली असते. त्यांना दया नको, तर संधी देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवण्याची गरज आहे. सक्षम संस्थेने दिव्यांगांच्या कल्याणासाठी असलेल्या योजना पोहोचवून, त्यांना मुख्य प्रवाहात सामावून घेत स्वावलंबी, स्वतःच्या पायावर उभे राहण्यास प्रोत्साहन द्यावे,” असे मत सक्षमच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष ऍड. मुरलीधर कचरे यांनी व्यक्त केले.
सक्षम पुणे महानगराच्या वतीने आयोजित वार्षिक अधिवेशनात ॲड कचरे बोलत होते. सदाशिव पेठेतील वि. रा. रुईया मूकबधिर विद्यालयात झालेल्या या अधिवेशनावेळी सक्षम पुणे महानगरचे अध्यक्ष डॉ. संजीव डोळे, उपाध्यक्ष अशोक जव्हेरी, सचिव दत्तात्रय लखे सुहास मदनाल आदी उपस्थित होते. निवृत्त अधिकारी नंदकुमार फुले यांनी ‘दिव्यांग कायदा व शासकीय योजना’ यावर, तर क्षिप्रा रोहित यांनी ‘अध्ययन अक्षमता’ यावर मार्गदर्शन केले. जनजागृतीपर शोभायात्रा काढण्यात आली.
ॲड. मुरलीधर कचरे म्हणाले, “सक्षमचे काम ४०० जिल्ह्यात ४३ प्रांताच्या माध्यमातून सुरु आहे. महाराष्ट्रात चार प्रांत कार्यरत असून, दिव्यांगांच्या कल्याणासाठी सक्षम चांगले काम करत आहे. घरचे, पालकांचे मार्गदर्शन आणि संस्थात्मक कार्याचा आधार दिव्यांगांना ऊर्जा देतो. उत्तम नागरिक घडविणे ही देखील देशाची संपत्ती आहे. दिव्यांगांसाठी काम करणे जिकिरीचे असले, तरी सक्षम संस्था हे काम नेटाने करत आहे.”
सामान्य लोकांकडून अनेकदा दिव्यांगांना सन्मान मिळत नाही, त्यामुळे कायद्यांची आवश्यकता भासते. दिव्यांगांसाठी अनेक कायदे आणि शासकीय योजना आहेत. त्याची माहिती घेऊन आपले जगणे सुसह्य आणि सन्मानजनक व्हावे, यासाठी दिव्यांगांनी प्रयत्न करावेत, असे नंदकुमार फुले यांनी सांगितले.
क्षिप्रा रोहित म्हणाल्या, अध्ययन अक्षमता ही समस्या मोठी आहे. शाळेत वाचण्यात येणाऱ्या अडचणी, त्यामुळे निर्माण होणारा अभ्यासाचा कंटाळा, परिणामी, पालक आणि समाजाकडून होणारा तिटकारा अशा समस्या झेलणाऱ्या मुलांची संख्या मोठी आहे. त्यांना ओळखून वेळीच योग्य मार्गदर्शन व उपचार करायला हवेत.
दत्तात्रय लखे यांनी प्रास्ताविक केले. किशोर रासकर यांनी सूत्रसंचालन केले. अशोक जव्हेरी यांनी आभार मानले.