१० ते १२ नोव्हेंबर या कालावधीत विश्वराजबाग लोणी काळभोर येथे
तीन दिवसीय चौथ्या राष्ट्रीय माध्यम व पत्रकारिता परिषदेचे आयोजन
सुशील कुमार माहापात्रा, नितु सिंग, रविलीन कौर यांना ‘जर्नालिझम फॉर पीस’ पुरस्कार
पुणे, ७ नोव्हेंबर : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या (MITWPU) स्कूल ऑफ मीडिया अँड कंमुनिकेशन, पुणे (School of Media & Communication) तर्फे तीन दिवसीय चौथ्या राष्ट्रीय माध्यम व पत्रकारिता परिषदेचे (National Conference on Media & Journalism) आयोजन करण्यात आले. दि. १० ते १२ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत लोणी काळभोर येथील विश्वराज बागेत असलेल्या जगातील सर्वात मोठा घुमट (Biggest Dome) अर्थात तत्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर विश्वशांती (World Peace) सभागृहात ही परिषद होणार आहे, अशी माहिती ‘एमआयटी’चे प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे आणि परिषदेचे निमंत्रक व स्कूल ऑफ मिडिया कम्युनिकेशनचे धीरज सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रसंगी ‘एमआयटी’चे कुलसचिव डॉ. प्रशांत दवे, संचालक डॉ. महेश थोरवे, स्कूल ऑफ मीडिया अँड कंमुनिकेशनच्या प्रा. डॉ. मिथिला बिनीवाले उपस्थित होते. मुंबई प्रेस क्लब, पुण्यातील आर. के. लक्ष्मण म्यूझियम, (RK Laxman) फॉरेन करस्पॉन्डन्ट क्लब ऑफ साउथ एशिया नवी दिल्ली (Foreign Correspondent) आणि पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्या सहयोगाने ही परिषद होत आहे. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड (Rahul Karad) यांच्या संकल्पनेतून आणि नेतृत्वाखाली होत असलेल्या परिषदेची यंदाची संकल्पना ‘संवाद, सर्वसमावेशकता आणि शांतता’ अशी आहे.
डॉ. मिलिंद पांडे म्हणाले, “परिषदेचे उद्घाटन येत्या गुरुवारी (दि. १०) सकाळी १०.३० वाजता ‘एएनआय’च्या (ANI) संपादिका स्मिता प्रकाश, खासदार जवाहर सरकार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आर. के. लक्ष्मण म्यूजियमच्या संचालिका उषा लक्ष्मण, ‘आयसीएचआर’चे अध्यक्ष पद्मश्री राघवेन्द्र तन्वर, न्यूज २४ च्या संपादिका अनुराधा प्रसाद, द डेली मिलापचे वरिष्ठ संपादक ऋषी सुरी, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष स्वप्नील बापट, ‘सकाळ’चे (Sakal) संपादक सम्राट फडणीस, प्राची कुलकर्णी, प्रा. प्रियंकर उपाध्ये आदी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड असतील.”
धीरज सिंग म्हणाले, “यावर्षीपासून शांततेसाठी पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना ‘जर्नालिझम फॉर पीस’ (Journalism for Peace) पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यंदाचा पहिला पुरस्कार एनडीटीव्हीचे सहयोगी संपादक सुशील कुमार माहापात्रा (ब्रॉडकॉस्टींग), नितु सिंग (डिजिटल) आणि डाउन टू अर्थ मुक्तपत्रकार रविलीन कौर (प्रिन्ट) यांना प्रदान करण्यात येणार आहे. ५० हजार रूपये रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. परिषदेचा समारोप शनिवारी (दि. १२) सकाळी १० वाजता होणार असून, सुप्रसिद्ध पत्रकार प्रा. के. जी. सुरेश प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.” देशातील पत्रकार व पत्रकारितेतील विद्यार्थी या परिषदेत सहभागी होतील. ही परिषद मोफत आहे. मात्र, नियोजनाकरिता www.mitwpu.ncmj.com या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असेही धीरज सिंग यांनी नमूद केले.
प्रा. डॉ. मिथिला बिनीवाले म्हणाल्या, “भारतीय पत्रकारितेची ७५ वर्षे, ओटीटी (OTT) : क्बॉक ब्लस्टरचे काय झाले, भूतकाळ-वर्तमान आणि भविष्याचे दस्तऐवजीकरण करणे, नवीन माध्यमात नव्या नोकर्यांची संधी, (Opportunities in new media) संघर्षाच्या काळात शांततेचा आवाज या विषयांवर पाच सत्रे होणार आहेत. दिग्दर्शक दिव्यांशु मल्होत्रा, अभिनेता, लेखक व गीतकार दिपेश सुमित्रा जगदीश, पटकथा लेखक सुलग्ना चॅटर्जी, अभिनेता सायनदीप सेनगुप्ता, दुरदर्शनचे माजी संचालक मुकेश शर्मा, कन्नड चित्रपट उद्योगाचे संचालक के. एस. श्रीधर, डॉक्युमेंटरी चित्रपट निर्माता मिरयम चंडी मेनाचेरी, जेडडीएफ जर्मन टेलिव्हिजन येथील निर्माता राघवेंद्र वर्मा, पुणेकर न्यूजचे व्यवस्थापकीय संपादक, बीआयएमएस इंडियाचे सीईओ मुबारक अन्सारी, द मॉर्निंग कॉन्टेक्स्टचे व्यवस्थापकीय संपादक टी. सुरेंदर आणि रेडिओ सिटी येथे डिजिटल सामग्रीचे प्रमुख आमिर तमीम यांच्यासह प्रतिष्ठित माध्यमाचे संपादक, पत्रकार आदी सत्रांमध्ये चर्चा करणार आहेत. याशिवाय, ‘मीडिया टू मीडिया कनेक्ट’ व ‘यूथ टू यूथ’ अशी दोन सत्रे होतील.”