पुणे : “संपूर्ण राग हा एक बगीचाच असतो. आपण त्यात हिंडत फिरत असतो; परंतु त्यालाही काही विशेष नियम असतात. बागेत जशा विश्रांती साठी जागा योजलेल्या असतात तसे रागात वादी-संवादी स्वर असतात. या रचनेला व्याकरणाचे नीयम असतात आणि आपण त्या सर्व गोष्टींना त्यातील वैशिष्ट्यांसह एकत्र आणून परिणाम देत असतो. हीच त्यातील एकात्मता आहे,” असे मत प्रसिद्ध शास्त्रीय गायिका सावनी शेंडे साठ्ये यांनी व्यक्त केले.
वर्ल्ड लँडस्केप आर्किटेक्चर मंथ २०२२ (WLAM 2022) व इंडियन सोसायटी ऑफ लँडस्केप आर्किटेक्ट्स – आयसोला (ISOLA) महाराष्ट्र चॅप्टर यांच्या वतीने आयोजित केलेल्या ‘कला : तत्व : ज्ञान’ या कार्यक्रमात हीच संकल्पना कलेच्या माध्यमातून मांडण्यात आली . भूदृश्य कला , स्थापत्य शास्त्र, संगीत आणि नृत्य या कलांमध्ये असलेले समांतर बंध उलगडण्यात आले. सावनी शेंडे यांचे गायन व प्रसिद्ध कथक नृत्यांगना व अभिनेत्री शर्वरी जमेनीस यांचे नृत्य यांचा स्थापत्य शास्त्राशी अनोखा मेळ साधत हा कार्यक्रम रंगला. लँडस्केप आर्किटेक्ट्स श्रुती फडणीस-हुमने आणि मंजुषा उकिडवे यांनी आयसोला च्या वतीने त्यांच्याशी संवाद साधला.
मावळतीला सजलेल्या या मैफलीची सुरुवात ‘आओ रे आओ रे, सब मिल गाओ रे…’ या राग पुरिया धनाश्री मधील रचनेने झाली . भांडारकर ओरीएन्टल रिसर्च सेंटर येथील निसर्गाचे सौंदर्य, सुरांचा फुलोरा आणि नृत्याचा साज अशा त्रिवेणी संगमाने सजलेल्या या मैफलीत रसिक मंत्रमुग्ध झाले. प्रत्येक कला आपली स्वतंत्र ओळख घेऊन फुलत असली, तरी त्यांची नाळ एकमेकांशी जुळलेली असते. याच धर्तीवर स्थापत्य कला शास्त्र, गायन व नृत्य कला यांचा सुरेख मेळ रसिकांना अनुभवायला मिळाला. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हा संबंध सावनी शेंडे यांनी गायनातील विविध प्रकारांतून, तर शर्वरी जमेनीस यांनी नृत्याविष्कारातून उलगडला.
सावनी शेंडे म्हणाल्या, “गाण्याच्या रियाजाव्यतिरिक्त असलेल्या वेळेत बागेत घालवते. त्यामुळे बागेतील फुले, झाडे यांच्यावर होणारा संगीताचा परिणाम जवळून अनुभवता येतो आहे,” यानंतर राग यमन मधील ‘धरती सजावे स्वर्ग पावे…’ ही रचना पेश करत निसर्गाशी समरसतेची अनुभूती दिली. यावेळी निखिल फाटक (तबला), राहुल गोळे (हार्मोनियम) यांनी साथसंग केली.
स्थापत्य विशारद धरतीच्या कॅनव्हासवर शिल्प साकारतात, गायक मन पटलावर आपल्या सुरांतून शिल्प उभारतात तर अवकाशाच्या कॅनव्हासवर आपल्या देहबोलीतून नृत्यांगना शिल्प साकारतात या साधर्म्याची अभूतपूर्व जादू रसिकांनी यावेळी अनुभवली. शर्वरी यांनी नृत्यवंदनेने कलाविष्काराला सुरुवात केली. नृत्याची ‘कोरिओग्राफी’ करताना पण अनेक भौमितिक आकारांचा विचार केला जातो. पण नर्तक/नृत्यांगनेला नेहमी केंद्रबिंदूचे भान ठेवावे लागते, असे सांगत शर्वरी यांनी अनेक मुद्रांचे प्रात्यक्षिक करून हे पटवून दिले. शेवटी सर्व तत्वांचा परिचय म्हणून डॉ. अशोक रानडे यांनी संगीतबद्ध केलेल्या कव्वालीने व सावनी शेंडे यांच्या भैरवी गायनाने समारोप झाला.