‘रिपाइं’चे सीए इन्स्टिट्यूट विरोधात आंदोलन

‘रिपाइं’चे सीए इन्स्टिट्यूट विरोधात आंदोलन

पुणे : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी हेतुपुरस्सर उल्लेख न केल्याच्या निषेधार्थ सनदी लेखापालांची संस्था ‘दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (रिपाइं) वतीने आंदोलन करण्यात आले. या अवमान प्रकरणी सीए इन्स्टिट्यूटने माफी मागण्याचे निवेदन ‘रिपाइं’च्या शिष्टमंडळाने पुणे शाखेचे अध्यक्ष सीए काशिनाथ पाठारे यांच्याकडे दिले. पठारे यांनी झालेल्या प्रकाराबाबत खेद व्यक्त करत डॉ. आंबेडकर यांचा यथोचित सन्मान करण्याचे आश्वासन देणारे पत्र ‘रिपाइं’ला दिले. तसेच दिल्लीतील मुख्यालयाशी याबाबत सविस्तर बोलण्याचे आश्वासन दिले.

बिबवेवाडी येथील ‘आयसीएआय’च्या पुणे शाखेसमोर ‘रिपाइं’ शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. प्रसंगी ‘रिपाइं’चे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, मातंग आघाडीचे हनुमंत साठे, महिला आघाडीच्या शशिकला वाघमारे, शहर कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, सचिव बाबुराव घाडगे, महिपाल वाघमारे, निलेश आल्हाट, वरिष्ठ उपाध्यक्ष वसंत बनसोडे, मोहन जगताप, उद्धव चिलवंत, शाम सदाफुले, रामभाऊ कर्वे, बाळासाहेब शेलार, अंबादास कोतले, सुगत धसाडे, बाळू साळवे, प्रकाश निंबाळकर, विक्की शिंदे, सदा शिंगे, सुधाकर राऊत, अर्जुन कांबळे आदी उपस्थित होते.

सनदी लेखापालांच्या संस्थेने १४ एप्रिल रोजी देशभरातील सनदी लेखापालांना शुभेच्छा संदेश पाठवला होता. त्यात बैसाखी, रमजान, महावीर जयंती, विशू, बिहू या सामानाच्या शुभेच्छा दिल्या गेल्या. मात्र, डॉ. आंबेडकर जयंतीचा उल्लेख केला नाही. अर्थतज्ज्ञ अशी ओळख असलेल्या डॉ. आंबेडकरांची जयंती जगभर साजरी होते. मात्र, सीए इन्स्टिट्यूट त्यांचा नामोल्लेख टाळते, हे निंदनीय आहे. यासंदर्भात पाठपुरावा करूनही सीए इन्स्टिट्यूटच्या मुख्यालयाकडून दखल घेतली गेली नाही, यामुळे आजचे हे आंदोलन आहे. या संदर्भात सीए इन्स्टिट्यूटच्या दिल्ली कार्यालयानेही जाहीर माफी मागावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा ‘रिपाइं’च्या वतीने देण्यात आला.

‘रिपाइं’च्या शिष्टमंडळाला प्रतिसाद देताना सीए पठारे म्हणाले, अर्थतज्ज्ञ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आम्हा सर्व सनदी लेखापालांसाठी पूजनीय आहेत. आमच्या देशभर जात असलेल्या मासिक सीए जर्नलमध्येही डॉ. आंबेडकर यांच्यावर लेखन केले जाते. त्यामुळे त्यांचा अनादर करण्याचा आमचा कोणत्याही प्रकारचा हेतू नव्हता. तरी अनावधानाने कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करतो. भविष्यात अशा प्रकारची चूक होणार नाही, याची काळजी घेऊ.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *