सुपर मार्केट, किराणा दुकानातून वाईन विक्री विरोधात ‘रिपाइं’ची निदर्शने

सुपर मार्केट, किराणा दुकानातून वाईन विक्री विरोधात ‘रिपाइं’ची निदर्शने

महाविकास आघाडी सरकारने त्वरित निर्णय मागे घ्यावा; अन्यथा दुकानात घुसून ‘बाटली फोडो’ आंदोलन करण्याचा इशारा

पुणे : सुपर मार्केट व किराणा दुकानांत वाईन विक्री निर्णयाच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (रिपाइं) आठवले गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन व निदर्शने करण्यात आली. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि ‘रिपाइं’चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली, तर शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात ही निदर्शने झाली. महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, या मागणीचे निवेदन ‘रिपाइं’च्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

प्रसंगी ‘रिपाइं’चे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, ‘रिपाइं’ नेते डॉ. सिद्धार्थ धेंडे, अशोक कांबळे, मोहन जगताप, अशोक शिरोळे, बाबूराव घाडगे, बसवराज गायकवाड, संजय सोनवणे, शशिकला वाघमारे, महिपाल वाघमारे, निलेश आल्हाट, श्याम सदाफुले, भगवान गायकवाड, कालिदास गायकवाड, लियाकत शेख, राहुल कांबळे, रामभाऊ कर्वे, मिनाज मेमन, मुकेश काळे, संतोष खरात, विनोद टोपे, उद्धव चिलवंत, महादेव नंदी, चिंतामण जगताप, गणेश जगताप, मंगल रासने, वसीम शेख, शोभा झेंडे, सुनाबी शेख, चांदणी गायकवाड, अक्षय गायकवाड, संदीप धांडोरे, सुरज गायकवाड, रवी अवसरमल, अक्षय अवसरमल, ऋषिकेश गवळी, शमशुद्दीन शेख, कुणाल सकते, शिवाजी उजागरे, अतुल बनसोडे, अतुल भालेराव, रमेश केलवडे, रोहित चौरे, राजेश काळे, संतोष गायकवाड, अमोल शेलार आदी उपस्थित होते.

शैलेंद्र चव्हाण म्हणाले, “फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात असा समाजघातक निर्णय खोडसाळपणाने घेतलेला आहे. महसूल वाढविण्याच्या व मूठभर शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेला हा निर्णय महाराष्ट्राला मद्यराष्ट्र अशी ओळख देणार आहे. याचा समाजमनावर विपरीत परिणाम होणार असून, भावी पिढी बरबाद करण्याचे काम अशाने होईल. हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अन्यथा आघाडी सरकारच्या विरोधात ‘रिपाइं’स्टाईल आंदोलन करू. महिला भगिनी किराणा आणि सुपर मार्केट मध्ये घुसून वाईन बाटली फोड आंदोलन करतील.”

बाळासाहेब जानराव म्हणाले, “शासनाने घेतलेला निर्णय हा दुर्दैवी असून, त्याचा जाहीर निषेध करतो. वास्तविक समाजात आधीच व्यसनाधीनता आहे. त्यात अशी सुविधा दिली, तर व्यसनाधीनतेचा भर पडेल. तरुण मुलांना किशोरवयीन मुलांमध्ये व्यसनाने प्रमाण वाढेल. देशातील एकूण ९२ वायनरी फॅक्टरीपैकी ७४ वायनरी फॅक्टरी महाराष्ट्रात आहेत व त्या सर्व महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांच्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला वेठीस धरण्याचे काम हे सरकार करत आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *