डॉ. बिपीन विभूते यांचा विश्वास; सह्याद्री हॉस्पिटलकडून २५० यकृत प्रत्यारोपणाचा टप्पा पार
पुणे, ता. १८ : “अवयवदानामुळे रुग्णांना नवीन जीवन मिळाले आहे. अवयवदानाबद्दल होत असलेली जनजागृती आणि यावरचा लोकांमध्ये वाढता विश्वास, यामुळे हे यश मिळाले आहे. पुणे हे उभरते आणि परवडणाऱ्या खर्चात अवयव प्रत्यारोपणाचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास येत आहे,” असा विश्वास सह्याद्री हॉस्पिटलमधील अवयव प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख डॉ. बिपिन विभूते यांनी व्यक्त केला.
सह्याद्री हॉस्पिटलने नुकतेच २५० यकृत प्रत्यारोपणाचा टप्पा पार केला आहे. त्या निमित्ताने ते बोलत होते. डॉ. विभूते म्हणाले, “सह्याद्री हॉस्पिटलने पाच वर्षांपूर्वी अवयवदानाचा कार्यक्रम सुरू केला. गेल्या पाच वर्षांत २५० यकृत प्रत्यारोपणाचा टप्पा पार केला असून, त्यात डेक्कनच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये २०० यकृत प्रत्यारोपण केले आहेत. अद्ययावत सुविधा, उपकरणे, प्रत्यारोपण तज्ज्ञ आणि प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी यामुळे पुणे हे अवयव प्रत्यारोपणाचे केंद्र देखील बनले आहे.” “प्रत्यारोपणामध्ये बहुतांश रुग्ण हे मध्यमवर्गीय किंवा ग्रामीण भागातील होते. ज्यांना प्रत्यारोपण परवडत नव्हते, त्यांच्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था व दाते खंबीरपणे उभे राहिले. या सर्व गोष्टींमुळे कुटुंबीयांमध्ये एक नवी आशा निर्माण झाली आणि मिळालेल्या यशामुळे प्रत्यारोपणाबाबतचा विश्वास देखील वाढला, ” असेही त्यांनी सांगितले.
सह्याद्री हॉस्पिटल समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अबरारअली दलाल म्हणाले, “भविष्यात
पुण्याच्या जवळच्या जिल्ह्यांमधील लोकांना सेवा मिळावी, यासाठी वैद्यकीय सुविधा अद्ययावत करण्यात येतील. पुणे हे आता तुलनेने परवडणारे अवयव प्रत्यारोपण केंद्र म्हणून पुढे येत असून, देशातील रुग्ण येथे उपचारासाठी येत आहेत.
डॉ. बिपिन विभूते यांच्या नेतृत्वात यकृत प्रत्यारोपण पथकात डॉ. अनिरुद्ध भोसले, डॉ. अपूर्व देशपांडे, डॉ. विकास चौधरी, डॉ. अभिजित माने, डॉ. शीतल धडफळे महाजनी, डॉ. संदीप कुलकर्णी, डॉ. निशा कपूर, पेडियाट्रिक हेपॅटोलॉजिस्ट डॉ. स्नेहवर्धन पांडे, प्रत्यारोपण भूलतज्ज्ञ डॉ. मनीष पाठक, डॉ. मनोज राऊत, डॉ. किरण ताठे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या शर्मिला पाध्ये, प्रत्यारोपण समन्वयक राहुल तांबे आणि अमन बेले यांचा समावेश आहे.
यकृताच्या आजारात वाढ
● देशात यकृतविकार वाढत आहेत. केवळ मद्यपान हे एकमेव त्यामागचे कारण राहिले नाही, तर चुकीची जीवनशैली, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव हे सर्व घटक यकृतविकाराची कारण म्हणून पुढे येत आहेत.
• यकृताविकाराकडे दुर्लक्ष केल्यास व वेळेत निदान आणि उपचार न घेतल्यास पुढील गुंतागुंत होऊ शकते.