पुणे : महापूर आणि दरड कोसळून महाड तालुक्यातील अनेक गावांना मोठा फटका बसला. या पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी लायन्स क्लब ऑफ पुणे सारसबाग यांच्या वतीने महाडमधील पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक साहित्य पाठविण्यात आले. जवळपास पाच लाखाची मदत महाड आणि परिसरात वितरित करण्यात आली. रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत या मदतीचे वितरण झाले.
लायन्स क्लबचे प्रांतपाल हेमंत नाईक यांच्या हस्ते साहित्य भरलेल्या ट्रकचे उद्घाटन करून त्या ट्रक महाडला पाठविण्यात आल्या. यावेळी रिजन चेअरपर्सन नीता शहा, झोन चेअरपर्सन दीपक सेठिया, कॅबिनेट ट्रेजरर शरद पवार, सर्व्हिस चेअरपर्सन नरेश राठी, लायन्स क्लब ऑफ पुणे सरसबागच्या अध्यक्षा दीपाली गांधी, सचिव अंजली ओसवाल, खजिनदार पूनम अष्टेकर, ज्येष्ठ सदस्य आशा ओसवाल आदी उपस्थित होते.
एक हजार ब्लॅंकेट, टॉवेल, अडीच हजार लिटर पाणी, ५०० लिटर फिनाईल, दोन हजार साबण, मेणबत्ती, काडीपेटी, १०० किलो तांदूळ, सॅनिटरी नॅपकिन आदी साहित्य पुरविण्यात आले. क्लबचे माजी अध्यक्ष उत्कर्ष गांधी, सदस्य अनिकेत आघाव, रौनक गांधी यांनी या जीवनावश्यक साहित्याचे महाड येथे जाऊन वाटप केले.