वाई/पुणे : सुरेंद्र पठारे फाऊंडेशन, श्रीनिवास पाटील फाऊंडेशन आणि गुरुद्वारा श्री गुरू सिंग सभा यांच्या वतीने सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त जोर (ता. वाई) गावातील नागरिकांच्या जेवणाचा प्रश्न सोडविण्याकरता ‘महालंगर’चे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी कम्युनिटी किचन सुरू केले असून, पौष्टिक अन्न शिजवून, त्याची पाकिटे बनवून जोर आणि आजूबाजूच्या नुकसानग्रस्त गावांमध्ये पोहचवली जात आहेत. यासह किराणा व जीवनावश्यक साहित्य पुरविण्यात येत आहे. पुढील किमान दहा दिवस महालंगर चालू राहणार आहे.
या मदतकार्यात ‘सुरेंद्र पठारे फाऊंडेशन’चे अध्यक्ष सुरेंद्र बापूसाहेब पठारे, श्रीनिवास पाटील फाऊंडेशनचे सारंग पाटील, रचना पाटील हे आज हिरीरीने सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणीही केली. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातल्या जोर या अवघ्या सातशे ते आठशे लोकवस्तीच्या गावाला नुकताच येऊन गेलेल्या पुराचा मोठा फटका बसला. या पुरामध्ये घरांची पडझड झाली, घरातले जीवनावश्यक सामानाचे, अन्नधान्याचे मोठे नुकसान झाले. पूरपरिस्थितीनंतर जागोजागी झालेल्या भूस्खलनामुळे नुकसानीत भरच पडली.
पूर परिस्थितीनंतर उद्भवणारा आरोग्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अबालवृद्धांसाठी आरोग्य शिबिर, महिलांसाठी स्वच्छतेची साधने, पेस्ट कंट्रोल, पिण्याचे व वापरण्याचे स्वच्छ पाणी, रेनकोट, गरम कपडे, बेडशीट, चादर, छत्र्यांचे वाटप, नुकसानग्रस्त सार्वजनिक इमारतींना रंग आदीही उपाययोजना सुरेंद्र पठारे फाऊंडेशन आणि श्रीनिवास पाटील फाऊंडेशन यांच्याकडून केल्या जात आहेत.