पुणे : कोरोना महामारीच्या काळात कोरोना बाधित रुग्णांवर ससून रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचारी यांनी उपचार करून रुग्णांना जीवनदान दिले. त्यानिमित्त बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांचा सन्मान माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी स्मृतिचिन्ह देऊन केला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसादिनी (दि. 22 ) हा सन्मान करण्यात आला.
कोरोनाच्या काळात ससूनने रुग्णसेवेचा आदर्श उभा केला आहे. येथील स्वतंत्र 11 मजली इमारत कोरोनाच्या रुग्णांसाठी देण्यात आली आहे. येथे हजारो कोविड रुग्णांनी मोफत उपचार घेतले असल्याने अनेकांना जीवनदान मिळाले आहे. तर, साडेचार लाखापेक्षा जास्त कोविड चाचण्या झाल्या आहेत. जनसेवेचा प्रवास खडतर परिस्थितीतून जात असताना ससूनचे रुग्णसेवेतील योगदान अमूल्य असल्याने एक कुटुंबप्रमुख म्हणून डॉ. तांबे यांचा सत्कार करण्यात आला आहे. या पुरस्काराचे आयोजक गोरखनाथ भिकुले, मायकल साठे व पंडित जगताप आहेत.
