डॉ. विकास आबनावे यांना प्रथम स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
पुणे : “समाजातील गोरगरीब मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारे, शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी मार्गदर्शन करणारे आणि अनेकांसाठी आधारवड राहिलेले डॉ. विकास आबनावे यांचे अकाली जाणे आपल्या सर्वांसाठीच दुःखाची गोष्ट आहे. त्यांच्या रूपाने समाजाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारा नेता हरपला आहे,” असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
बहुजनांच्या शिक्षणाचा, विकासाचा ध्यास घेत अखेरच्या श्वासापर्यंत कार्यमग्न राहिलेल्या महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव, प्रसिद्ध वक्ते डॉ. विकास आबनावे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमात रामदास आठवले बोलत होते. टिळक रस्त्यावरील संस्थेच्या अशोक विद्यालयात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मानद अध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी होते. प्रसंगी सचिव प्रसाद आबनावे, संचालक प्रथमेश आबनावे, पुष्कर आबनावे, दिलीप आबनावे, गौरव आबनावे, रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष संजय सोनावणे, परशुराम वाडेकर, ऍड. मंदार जोशी, ऍड. अयुब शेख, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, सर्वोदय नेते जयंत मठकर, वीरेंद्र किराड आदी उपस्थित होते.
रामदास आठवले म्हणाले, “पुणे आणि परिसरात शिक्षणसंस्था उभारून बहुजन समाजातील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम डॉ. विकास आबनावे यांनी केले. दरवर्षी बाबू जगजीवन राम संस्थेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही दिल्लीत एकत्र भेटत असायचो. त्यांचा लोकसंग्रह, अभ्यास, व्यासंग दांडगा होता. प्रत्येकाला आपलेसे करणारे त्यांचे वक्तृत्व अमोघ होते. त्यांनी सुरु केलेल्या कार्यात मला जे काही योगदान देता येईल, ते मी देईल.”
स्मृतिदिनानिमित्त दिवसभर हरिजन सेवक संघ, सर्वोदय संस्था, प्रथमेश एज्युकेशनल ट्रस्ट अशा विविध क्षेत्रातील संस्था, व्यक्ती यांनी डॉ. विकास आबनावे यांच्या स्मृतींना अभिवादन केले. मोहन जोशी यांनी प्रास्ताविकात डॉ. विकास आबनावे यांच्या कार्य-कर्तृत्वाविषयी, मैत्रीपूर्ण नात्याविषयी मनोगत व्यक्त केले. प्रसाद आबनावे यांनी आभार मानले. छाया आबनावे यांनी सूत्रसंचालन केले.