पुणे : सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक, शाकाहार कार्यकर्ते डॉ. कल्याण गंगवाल यांना बिहार येथील ‘आशा बिहार’ संस्थेच्या वतीने ‘अहिंसारत्न राष्ट्रीय पुरस्कार’ नुकताच प्रदान करण्यात आला. सदाचार, शाकाहार, जीवदया, पर्यावरण संवर्धन आणि व्यसनमुक्तीसाठी गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ केलेल्या सेवा कार्याबद्दल, तसेच ४० लाख लोकांना शाकाहारी बनवल्याबद्दल पद्मश्री विमल जैन यांच्या हस्ते डॉ. चंद्रकला व डॉ. कल्याण गंगवाल सन्मानित करण्यात आले.
बिहारच्या पाटणा येथील आचार्य विमलसागर भवन येथे झालेल्या या सोहळ्यात ‘आशा बिहार’च्या (अध्यात्म, अहिंसा आणि शाकाहारासाठी समर्पित) राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रीमती सरोज पाटणी, सचिव पराग जैन, दिगंबर जैन समितीचे सचिव कैलासचंद जैन, तेरापंथ समाजाचे मनोज बेगानी, श्रीमती सरिता वैद आदी उपस्थित होते.
विमल जैन म्हणाले, “सदाचार, शाकाहार व व्यसनमुक्तीसाठी डॉ. कल्याण गंगवाल यांचे कार्य अतुलनीय आहे. कोरोना काळातही त्यांनी वैज्ञानिक आहार आणि शाकाहार घेण्याचे महत्व पटवून दिले आहे. कॅन्सर, हृदयरोग याबाबत डॉ. गंगवाल यांचे कार्य मोलाचे आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे. अशा व्यक्तीला सन्मानित करताना मला आनंद वाटतो आहे. त्यांच्या हातून शाकाहार आणि व्यसनमुक्तीचे हे कार्य असेच घडत राहो.”
डॉ. गंगवाल म्हणले, ”शाकाहार, अहिंसा आणि जीवदया यासाठी गेली पन्नास वर्ष सातत्याने जे कार्य करत आहे, त्याचा हा सन्मान आहे. जैन धर्माचे मूलभूत तत्त्व अहिंसा परमो धर्मः आहे. जैन जीवनशैलीही आज संपूर्ण जगात आदर्श जीवनशैली मानली जाते. पर्यावरण रक्षण, ग्लोबल वार्मिंग, वाढता हिंसाचार या समस्यांसाठी केवळ महावीरांचे विचार आवश्यक आहेत. हा पुरस्कार स्वीकारताना आनंद होत आहे.”