‘एनएसई’चे शिल्पकार आशिष चौहान यांना  ‘सूर्यदत्त ग्लोबल अवॉर्ड २०२६’ प्रदान

‘एनएसई’चे शिल्पकार आशिष चौहान यांना ‘सूर्यदत्त ग्लोबल अवॉर्ड २०२६’ प्रदान

पुणे : भारतातील आधुनिक भांडवली बाजारपेठ आणि वित्तीय व्यवस्थेच्या उभारणीत मोलाचे योगदान दिल्याबद्दल नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे (एनएसई) व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अशिष चौहान यांचा सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे ‘सूर्यदत्त ग्लोबल अवॉर्ड’ द फादर ऑफ मॉडर्न फायनान्सियल डेरीव्हेटीव्ह्ज इन इंडिया’ पुरस्काराने विशेष सन्मान करण्यात आला.
 
मुंबई येथील ‘एनएसई’च्या मुख्यालयात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात चौहान यांना सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया आणि उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया यांच्या हस्ते मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रसंगी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या सल्लागार मंडळ सदस्या ऍड. गीता कस्तुरी, निर्माता डॉ. मयूर शहा, प्रसिद्ध फॅशन डिझाइनर संदेश नवलखा आदी उपस्थित होते.
 
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी चौहान यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, भारतात गुंतवणूक संस्कृती लोकाभिमुख करण्यासाठी आणि लाखो गुंतवणूकदारांना सक्षम करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य अत्यंत मोलाचे आहे. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे भारत जागतिक आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येण्यास मोठी मदत झाली आहे. आशिष चौहान हे वित्तीय बाजारातील नवकल्पना, डिजिटल परिवर्तन, गुंतवणूकदार जनजागृती आणि शाश्वत विकासासाठी सातत्याने कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी ‘बीएसई’ लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही यशस्वी नेतृत्व केले असून संस्थेच्या आधुनिकीकरणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.”
 
“भारतातील आधुनिक वित्तीय डेरिव्हेटिव्हज बाजारपेठेचे जनक म्हणून ओळखले जाणारे अशिष चौहान यांनी देशातील भांडवली बाजार अधिक पारदर्शक, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी सुलभ बनविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे भारताची वित्तीय व्यवस्था अधिक सक्षम झाली असून गुंतवणूकदारांचा सहभागही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आयआयटी मुंबई आणि आयआयएम कोलकाता येथील माजी विद्यार्थी असलेले चौहान हे १९९० च्या दशकात स्थापन झालेल्या नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतातील पहिली पूर्णपणे संगणकीकृत आणि स्क्रीन-आधारित इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग प्रणाली विकसित करण्यात आली. या प्रणालीमुळे भारतीय शेअर बाजारात पारदर्शकता, कार्यक्षमता, सुलभता आणि विश्वासार्हता वाढली आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

भारतातील इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज आणि अत्याधुनिक जोखीम व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यातही चौहान यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे भारतातील डेरिव्हेटिव्ह्ज बाजारपेठेला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली असून देश जगातील प्रमुख डेरिव्हेटिव्ह्ज ट्रेडिंग केंद्रांपैकी एक म्हणून उदयास आला आहे. या उपक्रमांमुळे बाजारातील तरलता, गुंतवणूकदारांचा विश्वास आणि वित्तीय समावेशनाला चालना मिळाल्याचे ते म्हणाले.