माजी केंद्रीय सुरेश प्रभू यांचे प्रतिपादन; सहकार पर्व राज्यस्तरीय सहकार परिषदेचे उद्घाटन
पुणे: “यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीने सहकार चळवळीला दिशा मिळाली आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ म्हणून सहकार चळवळ महत्वपूर्ण ठरली. आर्थिक विकासाबरोबरच सामाजिक विकास साधणारी ही सहकार चळवळ येणाऱ्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेची ताकद असणार आहे. सनदी लेखापालांनी सहकाराला अधिक सक्षम करण्यासाठी आर्थिक व्यवस्थापनाची जोड देण्यात योगदान द्यावे,” असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सीए सुरेश प्रभू यांनी केले.
दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल (डब्ल्यूआयआरसी), आयसीएआय पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सातारा, सांगली, इचलकरंजी व लातूर या शाखांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय ‘सहकार पर्व- राज्यस्तरीय सहकार परिषदेचे उद्घाटन शनिवारी झाले. त्यावेळी प्रभू दूरभाष प्रणालीद्वारे (व्हर्च्युअल) बोलत होते. दोन दिवसांच्या या सहकार परिषदेत विविध विषयांवर चर्चा होत आहे.
गणेशखिंड रस्त्यावरील कॉसमॉस टॉवरमध्ये आयोजित कार्यक्रमात ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, विभागीय समिती सदस्य सीए अभिषेक धामणे, सीए राजेश अग्रवाल, सीए डॉ. यशवंत कासार, आयसीएआय पुणे शाखेचे अध्यक्ष सीए प्रणव आपटे, उपाध्यक्ष सीए नीलेश येवलेकर, सचिव सीए नेहा फडके आदी व्यासपीठावर उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष सीए महावीर कोठारी, सातारा शाखेचे अध्यक्ष सीए झोहेब मुलानी, सांगली शाखेचे अध्यक्ष सीए निलेश पाटील यांच्यासह सीए, सहकार क्षेत्रातील मान्यवर, तज्ज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सीए सुरेश प्रभू म्हणाले, “स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपल्याकडे सहकार क्षेत्र अस्तित्वात आहे. पुढे यशवंतरावांसह वसंतदादा पाटील, शरद पवार आणि इतर सर्वच नेत्यांनी सहकाराला उभारी दिली. पश्चिम महाराष्ट्राच्या विकासात सहकार क्षेत्राचा मोठा वाटा आहे. सामाजिक परिवर्तनाचे माध्यम असलेल्या सहकाराने राजकरण, समाजकारण, अर्थकारण सर्वच गोष्टीना वेगळी दिशा दिली आहे. सहकाराचे महत्व ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र सहकार मंत्रालयाची स्थापना केली. अमित शहा यांच्यासारख्या सक्षम मंत्र्याकडे त्याचा कार्यभार दिला. त्यामुळे देशभरात सहकार क्षेत्राचा विस्तार होत असून, साखर कारखाने, कृषिपूरक व्यवसाय, संस्था, दूध डेअरी, सहकारी बँक, पतसंस्था अशा विविध सहकारविषयक गोष्टींचा व्यापक विस्तार होत आहे. भविष्यात सहकार क्षेत्र देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान देणार आहे. सीएना या क्षेत्रातही मोठ्या संधी उपलब्ध आहेत.”
सीए चंद्रशेखर चितळे म्हणाले, “शेतीप्रधान अर्थव्यवस्थेला सक्षम करण्यात सहकार क्षेत्राची भूमिका महत्वाची राहिली आहे. सहकाराचे महत्व देशभर वाढले असून, सहकारातून समृद्धीकडे या ध्येयाने सरकार काम करीत आहे. या चळवळीला व्यापक रूप यावे, व्यवस्थापन नीट होऊन, भागधारकांना लाभ व्हावा, अर्थव्यवस्थेला उभारी मिळावी, सहकारावर अवलंबून सर्व घटकांना विकासाची संधी मिळावी, यासाठी नव्याने आलेले सहकार धोरण उपयुक्त ठरेल. आर्थिक व्यवस्थापनात सनदी लेखापालांनी पुढाकार घ्यावा.”
सीए अभिषेक धामणे यांनी सहकाराचे महत्व अधोरेखित करीत या परिषदेच्या आयोजनामागील भूमिका मांडली. पुढील १५ वर्षांत सहकार क्षेत्रात आमूलाग्र बदल होणार असून, येऊ घातलेल्या या नवीन पर्वात आपण सनदी लेखापाल योगदान द्यायला हवे, असेही त्यांनी नमूद केले. सीए डॉ. यशवंत कासार व सीए राजेश अग्रवाल यांनी मनोगत व्यक्त केले. सीए प्रणव आपटे यांनी स्वागत प्रास्ताविक केले. सीए नेहा फडके यांनी सूत्रसंचालन केले. सीए निलेश येवलेकर यांनी आभार मानले.
