पुणे : संसदेत नारीशक्ती विधेयक मंजूर न झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले असून सत्ताधारी भारतीय जनता पार्टी कडून विरोधकांवर टीकेची झोड उठवली जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार तेजस्वी सूर्या यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आरोप केला की, काँग्रेस पक्षाचा इतिहास महिलांविरोधी राहिला असून महिला आरक्षणासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावरही त्यांनी सातत्याने विरोधाची भूमिका घेतली आहे.
सूर्या म्हणाले की, मोदी सरकारने प्रयत्न करूनही इंडिया आघाडीकडून नारीशक्ती विधेयकाला पाठिंबा मिळाला नाही. त्यामुळे महिलांना आरक्षण देण्याचा मार्ग अडथळ्यात आला. “काँग्रेसने यापूर्वीही अनेकदा हे विधेयक मांडले, मात्र विविध कारणे देत त्यालाच विरोध केला,” असा दावा त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, भाजप देशभरातील प्रत्येक महिलांपर्यंत ही बाब पोहोचवणार असून महिला आरक्षणासाठीचा लढा सुरूच राहणार आहे. तसेच भविष्यात हे विधेयक पुन्हा संसदेत मांडल्यास त्याला कोणीही विरोध करणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यातील राजकारणावर भाष्य करताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनाही लक्ष्य केले. “महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याच्या प्रयत्नांनाही या पक्षांनी विरोध केला,” असा आरोप त्यांनी केला.
डीलीमिटेशनच्या मुद्द्यावरही सूर्या यांनी काँग्रेसवर दुहेरी भूमिका घेतल्याचा आरोप केला. “काँग्रेस सत्तेत असताना डीलीमिटेशन योग्य वाटते, पण भाजप सत्तेत असताना त्यालाच विरोध केला जातो,” असे ते म्हणाले.
दरम्यान, काँग्रेसच्या महिला खासदारांनी चर्चेचे आव्हान दिल्याबाबत प्रतिक्रिया देताना सूर्या यांनी हे आव्हान स्वीकारले असून “मी जनतेसमोर या विषयावर खुली चर्चा करण्यास तयार आहे,” असे स्पष्ट केले.
