पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी पुणे दौऱ्यादरम्यान राज्यातील ड्रग्स समस्येवर कठोर भूमिका मांडत सरकारवर निशाणा साधला. राज्यात मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचा पुरवठा होत असून, तो रोखण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप त्यांनी केला.
संघटन बळकटीसाठी राज ठाकरे यांनी राज्यभर संपर्क अध्यक्षांची नियुक्ती केली असून, प्रत्येक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून संघटनेत आवश्यक बदल केले जाणार असल्याचे अमित ठाकरे यांनी सांगितले. यासंदर्भात सविस्तर अहवाल तयार करून तो राज ठाकरे यांच्याकडे सादर केला जाणार आहे. तसेच २५ व २६ तारखेला ग्रामीण भागात दौरा करून कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचे नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली.
गोरेगावमधील ड्रग्स प्रकरणाचा उल्लेख करत त्यांनी सरकारला सवाल केला की, “राज्यात ड्रग्स इतक्या मोठ्या प्रमाणात येतात कुठून?” शाळांच्या परिसरातही ड्रग्स विक्री होत असल्याचा गंभीर आरोप करत, “या विरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि पोलिसांना २४ तास ‘फ्री हँड’ दिला पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी त्यांनी पोर्शे कार प्रकरणाचाही संदर्भ देत, “आपण काही घटना विसरतो, पण ड्रग्ससारख्या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होता कामा नये,” असे मत व्यक्त केले. “गरज पडल्यास आम्ही रस्त्यावर उतरू,” असा इशाराही त्यांनी दिला.
नाशिकमधील प्रकरणावर बोलताना त्यांनी कंपन्यांचे शंभर टक्के ऑडिट करण्याची मागणी केली. “कंपनीत कोण काम करतं, याची पूर्ण माहिती असली पाहिजे,” असे ते म्हणाले.
यावेळी कठोर भूमिकाही त्यांनी मांडली. “मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती. अशा गुन्ह्यांवर उदाहरण घालणारी शिक्षा झाली पाहिजे,” असे सांगत त्यांनी पुन्हा एकदा पोलिसांना पूर्ण स्वातंत्र्य देण्याची मागणी केली. तसेच “महाराष्ट्र राज ठाकरे यांच्या हातात दिल्यास ते राज्य स्वच्छ करू शकतात,” असा दावा त्यांनी केला.
