ज्येष्ठ विचारवंत प्रा. सुभाष वारे यांचे प्रतिपादन; अठ्ठाविसाव्या विश्वबंधुता साहित्य संमेलनाचे पुण्यात उद्घाटन

ज्येष्ठ विचारवंत प्रा. सुभाष वारे यांचे प्रतिपादन; अठ्ठाविसाव्या विश्वबंधुता साहित्य संमेलनाचे पुण्यात उद्घाटन

पुणे: “भवतालात तीव्रतेने पसरत असलेला द्वेषभाव, विषमता आणि तणावाचे वातावरण चिंताजनक आहे. जाती, धर्म आणि प्रांतवादाच्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये माणुसकीचा बंध अधिक घट्ट होण्याची गरज असून, त्यासाठी सर्वच महामानवांनी दिलेल्या बंधुतेच्या विचारांचा अंगीकार करायला हवा. त्यातूनच जगात बंधुभाव आणि शांतता प्रस्थापित होण्यास मदत होईल,” असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. सुभाष वारे यांनी केले. माणूस म्हणून आपण कधी जगणार आहोत, याचा विचार करण्याची वेळ आज आल्याचेही त्यांनी नमूद केले.

विश्वबंधुता साहित्य परिषद, भारतीय जैन संघटनेचे वाघोली येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व काषाय प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २८ व्या विश्वबंधुता साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रा. सुभाष वारे यांच्या हस्ते झाले. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात आयोजित संमेलनाच्या अध्यक्षस्थानी बंधुताचार्य प्रकाश रोकडे होते. प्रसंगी प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, ज्येष्ठ कवी प्रा. चंद्रकांत वानखेडे, कादंबरीकार प्रा. शंकर आथरे, निमंत्रक मंदाकिनी रोकडे, कार्याध्यक्ष प्राचार्या डॉ. मनीषा बोरा, स्वागताध्यक्ष शरयू पवार, कवयित्री संगीता झिंजुर्के आदी उपस्थित होते.
 
प्रा. सुभाष वारे म्हणाले, “वर्चस्ववादाच्या भावनेतून गळेकापू स्पर्धेला बळ मिळत आहे. जाती-धर्मांतील द्वेष वाढीस लागला आहे. संत ज्ञानेश्वरांपासून जगद्गुरू तुकारामांपर्यंत आणि महात्मा फुले यांच्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत सर्वांनीच बंधुतेचा, माणुसकीचा संदेश दिला आहे. त्यांच्या नावाचा जयजयकार आपण करतो. मात्र, त्यांच्या विचारांना आत्मसात करीत नाही. जैविक समतेच्या आव्हानात्मक काळात आपल्याला बंधुतेचा विचार अधिक तीव्रतेने पेरावा लागेल. मनामनात भिनत असलेली विषमता, द्वेषभाव संपवायचा असेल, तर शिक्षणाच्या समान संधी देण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग आपला साथी म्हणून केला, तर ते आपल्यासाठी वरदान ठरेल. शुद्ध विचाराने त्याचा उपयोग सर्वांनीच केला पाहिजे.”
 
अध्यक्षीय भाषणात बंधुताचार्य प्रकाश रोकडे म्हणाले, “समाजात जात, धर्म, भाषा आदी आधारांवर निर्माण होणारे भेद दूर करून संविधानातील समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांचा प्रसार करणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक माणूस जन्मतः ‘माणूस’ म्हणून येतो; मात्र सामाजिक व्यवस्थेमुळे त्याला विविध चौकटीत अडकवले जाते. अशावेळी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज वाटते. संविधान हेच खरे राष्ट्रीय मार्गदर्शक असून त्यातील मूल्ये आचरणात आणल्याशिवाय लोकशाही सक्षम होणार नाही. बंधुता हीच राष्ट्रीय एकात्मतेची पायाभूत शक्ती आहे. शिक्षण केवळ बौद्धिक विकासापुरते मर्यादित न राहता संवेदनशीलता, मूल्यनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकी वाढवणारे असावे. त्याच भावनेतून गेल्या ५० वर्षांपासून विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून बंधुतेचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य सुरू असून, प्रत्येक नागरिकाने वैयक्तिक पातळीवर समता आणि मानवतेचा स्वीकार करावा.”
 

डॉ. अरुण आंधळे यांनी बंधुतेचे हे व्यासपीठ वैचारिक, सामाजिक प्रगल्भता देणारे असून, मला अशा चळवळीत योगदान देता येत असल्याचे समाधान वाटते, असे सांगितले. संगीता झिंजुर्के यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मनीषा बोरा यांनी प्रास्ताविक केले. शरयू पवार यांनी स्वागतपर भाषण केले. प्रा. शंकर आथरे यांनी आभार मानले. चंद्रकांत वानखेडे यांच्या पहाडी आवाजातील, तर संगीता झिंजुर्के यांच्या मंजुळ आवाजातील गीतगायनाने संमेलनाची सुरुवात झाली.

——————————
कांबळे, वासाडे, डॉ. सातपुते यांना पुरस्कार
या संमेलनात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले काव्यपुरस्काराने सीमा झुंजारराव, मधुराणी बनसोड, चंदन तरवडे, नंदा कोकाटे, ऍड. नीता कचवे, पल्लवी उमरे, वैशाली मुन, प्रीती मोरे, अश्विनी जाधव, उमा लूकडे, पौर्णिमा कुंभारकर यांना संमनीत करण्यात आले. तसेच दुपारच्या सत्रात झालेल्या वंदे संविधान काव्यसंमेलनात डॉ. सुशील सातपुते यांना लोककवी वामनदादा कर्डक साहित्य पुरस्कार, विजय वासाडे यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्कार, तर गोपाळ कांबळे यांना पद्मश्री नामदेव ढसाळ साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.