पंचाहत्तराव्या सीए स्थापना दिनानिमित्त ७५ सनदी लेखापालांचा सन्मान

पंचाहत्तराव्या सीए स्थापना दिनानिमित्त ७५ सनदी लेखापालांचा सन्मान

पंचाहत्तराव्या सीए स्थापना दिनानिमित्त ७५ सनदी लेखापालांचा सन्मान

पुणे : पंचाहत्तराव्या सीए स्थापना दिनानिमित्त दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पुणे शाखेच्या वतीने ७५ सनदी लेखापालांचा कृतज्ञता सन्मान करण्यात आला. यामध्ये ७५ वर्षांवरील ज्येष्ठ सनदी लेखापाल, ‘आयसीएआय’चे माजी केंद्रीय समिती सदस्य, विभागीय समिती सदस्य व कार्यकारिणी सदस्य यांचा समावेश होता.

७५ व्या सीए स्थापना दिनानिमित्त आयसीएआय पुणे शाखेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी सारसबाग ते बिबवेवाडी येथील आयसीएआय भवन पर्यंत वॉकेथॉन, आयसीएआय भवनात ध्वजारोहण, ज्येष्ठ सदस्यांचा कृतज्ञता सन्मान, सह्याद्री हॉस्पिटलच्या साहाय्याने आरोग्य तपासणी शिबीर, रिबर्थ ट्रस्टच्या सहकार्याने अवयवदान जागृती, तळजाई टेकडीवर वृक्षारोपण व स्वच्छता, विविध सीए फर्मच्या मदतीने १२ ठिकाणी रक्तदान शिबीर, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा, अर्थसाक्षरता आदी कार्यक्रम झाले. याप्रसंगी दिल्ली येथील ‘आयसीएआय’च्या मुख्य कार्यालयामध्ये अमृत महोत्सवी वर्षाच्या लोगोचे अनावरण झाले.

ज्येष्ठ सनदी लेखापाल डॉ. एस. बी. झावरे उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले, “गेल्या ७५ वर्षांत सनदी लेखापालांनी भारताच्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी दिलेले योगदान महत्वपूर्ण आहे. देशाच्या आर्थिक विकासाचा कणा म्हणून या व्यवसायाकडे पाहिले जाते. त्यामुळे आपण प्रामाणिकपणे व सचोटीने आपले काम करत राहावे.”

सीए ऋता चितळे, सीए यशवंत कासार, सीए राजेश अग्रवाल यांनी ज्येष्ठ सनदी लेखापालांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. सनदी लेखापालांच्या गेल्या ७५ वर्षांतील योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला. सीए प्रणव मंत्री यांनी सूत्रसंचालन केले. सीए अमृता कुलकर्णी यांनी आभार मानले. सीए ऋषीकेश बडवे यांनी गुरुवंदना सादर केली.

यावेळी आयसीएआयच्या विभागीय समितीचे सदस्य सीए यशवंत कासार, सीए ऋता चितळे, आयसीएआय पुणे शाखेचे अध्यक्ष सीए राजेश अग्रवाल, उपाध्यक्षा सीए अमृता कुलकर्णी, खजिनदार सीए ऋषिकेश बडवे, पुणे विकासाचे अध्यक्ष सीए सचिन मिनियार,कार्यकारिणी सदस्य सीए काशिनाथ पठारे, सीए प्रितेश मुनोत, सीए प्रणव आपटे, सीए मौशमी शहा आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *