भ्रष्ट अधिकारी संजय ताकसांडे यांच्यावर कारवाई केव्हा होणार? भालचंद्र सावंत यांचा सवाल
पुणे : जनतेच्या पैशावर चालणारी महावितरण कंपनी भ्रष्टाचाराचे कुरण बनली आहे. पर्वती विभागातील वडगाव-धायरी उपविभागात नवीन जोड देताना तत्कालीन प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे, ठेकेदार व बिल्डर्सच्या संगनमताने १०० कोटींचा अपहार झाला असल्याचा दावा माहिती अधिकार कार्यकर्ते व राष्ट्रनिर्माण दलाचे अध्यक्ष भालचंद्र सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला. आपल्या पदाचा गैरवापर करत जवळच्या ठेकेदार व नातेवाईकांचे उखळ पांढरे करून महावितरणचे हजारो कोटींचे नुकसान करणाऱ्या भ्रष्ट संजय ताकसांडे यांच्यावर कारवाई कधी होणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यावेळी दलाचे दयानंद कनकदंडे व संतोष शिंदे उपस्थित होते.
भालचंद्र सावंत म्हणाले, “महावितरण महाराष्ट्र शासनाची अंगीकृत कंपनी आहे. त्यामध्ये जनतेचा पैसा लागलेला असल्याने नियोजन व प्रगतीसाठी शासनातर्फे संचालक मंडळ नेमले जाते. मंडळावर नियुक्त होणारा अधिकारी हा स्वच्छ चारित्र्याचा, निष्कलंक व प्रामाणिक असायला हवा. मात्र, ताकसांडे यांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून कंपनीशी बेईमानी केली आहे. १०० कोटींच्या अपहारप्रकरणी झालेल्या चौकशीत ११ अधिकारी दोषी आढळले. मात्र ताकसांडे यांनी चौकशी करणाऱ्या मुख्य अभियंत्यांना दोषींवर थातूरमातुर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यातून त्यांनी हे प्रकरण दडपल्याचे दिसून येते.”
“महावितरण कंपनीचे इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्याकरिता शासनाने इन्फ्रा-२ प्रकल्प मंजूर करून महावितरणला रु. ८३०४/- कोटीचे कर्ज मंजूर केले. या योजनेचाही लाभ गरजू लोकांऐवजी भोसरीतील बिल्डर व ठेकेदारांनाच दिल्याचे चौकशीत आढळले. त्यामध्ये ६५ लाखाचे नुकसान, तसेच एकूण नऊ अभियंते, कर्मचारी दोषी आढळले. येथेही ताकसांडे यांनी पदाचा गैरवापर केला. ताकसांडे वसईला अधीक्षक अभियंता असतांना महावितरणने ठाण्याच्या माणिकपूर पोलीस स्टेशनमध्ये फौजदारी गुन्हा नोंदवला असून, प्रकरणाची सुनावणी अद्यापही सुरु आहे. त्यामुळे ताकसांडे यांचे पदोन्नतीचे प्रकरण निकाल लागेपर्यंत सीलबंद ठेवणे आवश्यक होते. परंतु नियम डावलून त्यांना मुख्य अभियंतापदी पदोन्नती कशी दिली? गैरकृत्यामुळे लावलेल्या विभागीय चौकशीत चौकशीत ताकसांडे दोषी आढळल्याने महावितरणने त्यांना बडतर्फही केले होते. मात्र, त्यांनी स्वत:चे पुनर्वसन करून घेतले,” असे सावंत यांनी नमूद केले.
सावंत पुढे म्हणाले, “बुलढाणामध्ये थकबाकी कमी दाखवण्याचा प्रताप त्यांनी केला. तेथे ६५ कोटींचे नुकसान झाल्याचे दक्षता समीतीला आढळले. अकोल्यात ठेकेदारांना हाताशी धरून १०-१५ टक्के जास्त दराने निविदा भरण्यास सांगून करोडोची वसूली केली. पुणे ग्रामीण मंडळांतर्गत मुळशी विभाग, हडपसर ग्रामीण विभागाअंतर्गत मांजरी येथे गोदरेज कंपनीला चुकीच्या मार्गाने जोडणी देण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे अस्तित्वात असलेल्या वाहिनीवरील लोड वाढून सर्वसामान्य जनतेला त्रास होणार आहे. तसेच यात गोदरेज कंपनीला फायदा, तर महावितरणला मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे.
“ताकसांडे प्रादेशिक संचालक झाल्यावर बदली धोरणाला हरताळ फासत अभियंत्याच्या बदल्या करण्याचा सपाटा सुरु केला. ताकसांडे यांच्या मागण्या पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांची इच्छित स्थळी, तर इतरांची अवांछित ठिकाणी बदली केली. आदेश प्रशासकीय कारणास्तव झाल्याने महावितरणला बदली भत्ता द्यावा लागला असून, त्यामुळे कंपनीला प्रचंड आर्थिक नुकसान झाले. यात वरिष्ठांची मंजूर नाही, तसेच संकेतस्थळावर बदलीची माहिती नाही. यामध्ये मोठी आर्थिक अफरातफर झाली आहे. महावितरणने कार्यकारी संचालक पदावर नियुक्तीसाठी मुख्य अभियंता या पदाचा तीन वर्षे अनुभव विहित केला होता. ताकसांडे त्यात बसत नसल्याने वेगळे दुरुस्तीपत्र काढून अनुभवाची अट एक वर्षावर आणली आणि ताकसांडे यांची निवड कार्यकारी संचालक म्हणून झाली. परिणामी, अनुसूचित जातीचे पात्र उमेदवार डावलले गेले,” असे सावंत म्हणाले.
“महापारेषण कंपनीमध्ये संचालक (संचालन) या पदावर नियुक्ती करिता सदरचे पद रिक्त नसतानाही नियुक्ती करून घेतली. या पदावर येताच एखाद्या राजाप्रमाणे तेथील ५२ अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांना पदोन्नती देण्याकरिता महिनाभर नियुक्तीसाठी ताटकळत ठेवले. ज्या अधिकाऱ्यांनी ताकसांडेना गैरकृत्यात मदत केली नाही, त्यांचावर ताकसांडे यांनी सूड भावनेतून कारवाईचा सपाटा लावला. निलंबन, चौकशी मागे लावली. या सगळ्याचा पाठपुरावा करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या, माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या विरोधात ब्लॅकमेलिंग, खंडणी असे खोटे आरोप लावण्याचे प्रकारही ताकसांडे करत आहेत. मात्र, आम्ही हिम्मत न हारता अशा गुन्हेगारी आणि भ्रष्ट पार्श्वभूमी असलेल्या ताकसांडे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी लढा देत आहोत. ताकसांडे यांची सखोल चौकशी होऊन लवकरात लवकर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आम्ही करत आहोत,” असे सावंत यांनी आग्रहपूर्वक सांगितले.