- अष्टांग आयुर्वेद आणि ‘सूर्यदत्ता कॉलेज ऑफ हेल्थ सायन्स’ यांच्यात शरीरशास्त्राच्या अभ्यासासाठी सामंजस्य करार
- सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे वैद्यकीय, अध्यापनासाठी डॉ. मधुकर परांजपे यांचा ‘प्रोफेसर इमेरीटस’ने सन्मान
- अष्टांग आयुर्वेद आणि ‘सूर्यदत्ता कॉलेज ऑफ हेल्थ सायन्स’ यांच्यात ‘अकॅडमी टू अकॅडमी’ करार
-
डॉ. मधुकर परांजपे यांची ‘सूर्यदत्ता’च्या सल्लागार मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती
पुणे : आयुर्वेद शिक्षण मंडळाचे अष्टांग आयुर्वेद महाविद्यालय व सुर्यदत्ता कॉलेज ऑफ हेल्थ सायन्स आणि सूर्यदत्ता कॉलेज ऑफ फिजिओथेरपी यांच्यात शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला. याअंतर्गत फिजिओथेरपी महाविद्यालयासाठी लागणाऱ्या शरीरशास्त्र विषयाच्या अभ्यासासाठी अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयातील प्रयोगशाळा उपलब्ध होणार आहे.
सामंजस्य करार करतेवेळी अष्टांग आयुर्वेद विद्यालयाचे संस्थापक सदस्य व सचिव डॉ. मधुकर परांजपे, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया, सूर्यदत्ता कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या विभागप्रमुख डॉ. सायली अथणीकर आदी उपस्थित होते. प्रसंगी डॉ. मधुकर परांजपे यांना सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे वैद्यकीय, अध्यापनासाठी ‘प्रोफेसर इमेरीटस’ सन्मान प्रदान करण्यात आला. तसेच ‘सूर्यदत्ता’च्या सल्लागार मंडळाच्या सदस्यपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी बोलताना डॉ. मधुकर परांजपे म्हणाले, “आयुर्वेदाला अडीच हजार वर्षांची परंपरा असून, हे शास्त्र शाश्वत आहे. या शास्त्राला कमी न लेखता त्याचा प्रचार-प्रसार करण्याची गरज आहे. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीला असताना माझे वडील व अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयाचे संस्थापक वैद्य हरीभाऊ परांजपे यांच्यामुळे अष्टांग आयुर्वेदामध्ये आलो. आयुर्वेदाचा प्रचार करण्याच्या उद्देशाने गेल्या पन्नास वर्षांपासून अविरत कार्य करत आहे. आयुर्वेद चिकित्सा करताना सर्व संकल्पना समजून घेत प्रात्यक्षिकेही केली पाहिजेत. अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयात शिक्षण घेऊन अनेक नामवंत वैद्य आपापल्या परीने आयुर्वेदाला पुढे नेताहेत, हे पाहून आनंद वाटतो.”
“सूर्यदत्ता संस्थेने प्रा. डॉ. संजय चोरडिया यांच्या नेतृत्वात केलेल्या प्रगतीचा मी साक्षीदार आहे. येत्या काळात ‘सूर्यदत्ता’ने वैद्यकीय क्षेत्रात उतरावे व आयुर्वेद, होमियोपॅथी महाविद्यालये सुरु करावीत. त्या माध्यमातून आयुर्वेदाचा प्रसार करावा. त्याचा सर्व मानवजातीला फायदा होईल. अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयाशी झालेल्या सामंजस्य करारामुळे शरीरशास्त्राच्या अभ्यासासाठी सूर्यदत्तामधील विद्यार्थ्यांना फायदा होईल. फिजिओथेरपीला फारशी मान्यता नव्हती. पण परदेशात त्याला मोठी मागणी आहे. आज आपल्याकडेही जागृती होत आहे. फिजियोथेरपी डॉक्टर मोठ्या प्रमाणात तयार व्हावेत.”
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “डॉ. मधुकर परांजपे हे ऋषीतुल्य व्यक्तिमत्व आहेत. आयुर्वेदासह वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी दिलेले भरीव योगदान आपल्या सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. त्यांच्या मार्गदर्शनात अनेक दिग्गज मंडळी घडली आहेत. सहा दशकांहून अधिक काळ त्यांची सेवा झाली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता ‘सूर्यदत्ता’च्या विद्यार्थ्यां नाही शिकण्याची संधी मिळणार आहे. डॉ. परांजपे यांच्या मौलिक कार्याची दखल घेऊन त्यांना ‘प्रोफेसर इमेरीटस’ हा सन्मान प्रदान करताना आनंद वाटतो.”