विद्यार्थी साहाय्यक समितीच्या वतीने देणगीचे आवाहन; ३३६ गरजू व होतकरू मुलींच्या निवासाची सोय होणार
पुणे : ग्रामीण भागातून पुण्यात उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या गरजू व होतकरू मुलींसाठी विद्यार्थी साहाय्यक समितीच्या वतीने पुण्यात उभारण्यात येत असलेल्या वसतिगृहासाठी आर्थिक हातभार लावण्याची संधी दानशूर/संवेदनशील पुणेकरांना आहे. ३३६ मुलींच्या निवासाची सोय होणाऱ्या या वसतिगृहाच्या निर्माणासाठी पुणेकरांनी यथायोग्य अर्थसहाय्य करावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
गेल्या ६९ वर्षांत समितीने ग्रामीण भागातील हजारो मुलामुलींना उत्तम पद्धतीने घडविण्याचे काम केले आहे. गरीब मुलींच्या उच्च शिक्षणामुळे ग्रामीण भागातील गरिबी निर्मूलन, त्यांचे सक्षमीकरण आणि त्यायोगे समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचा हा प्रयत्न आहे. आज समितीमध्ये ३२५ मुली व ४५० मुले असे एकूण ७७५ विद्यार्थी राहात असून, पुण्याच्या विविध महाविद्यालयात शिकत आहेत. मराठवाडा, विदर्भ यासह महाराष्ट्रातील अतिदुर्गम भागातील हे विद्यार्थी आहेत. समिती म्हणजे केवळ लॉजिंग बोर्डिंग नाही तर युवा सक्षमीकरणाची चळवळ आहे येथे माफक दरात निवास, भोजन व्यवस्थेबरोबर व्यक्तिमत्त्व विकास या संकल्पनेला सर्वाधिक महत्त्व आहे. समितीत जात, धर्म, पंथ या संकल्पनेला थारा नाही. स्वच्छता, समता आणि श्रमप्रतिष्ठा या त्रिसूत्रीवर येथे काम चालते. सर्वांगीण विकासातून युवा सक्षमीकरण हे समितीचे ब्रीद आहे. देणगीदार जरी शहरी भागातले असले तरी प्रवेश फक्त ग्रामीण भागातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांनाच दिला जातो.
अलीकडच्या काळात ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलींचे प्रमाण वाढले आहे हा मोठा सामाजिक बदल आहे त्यांना सुरक्षित आसरा देण्याच्या उद्देशाने समितीने ३३६ मुलींचे वसतिगृह उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. यामध्ये ११२ खोल्या आहेत. एका खोलीचा खर्च दहा लाख रुपये आहे. एवढी दहा लाखांची देणगी व्यक्तिगत/ कौटुंबिक/ समूहातर्फे मिळाल्यास खोलीला देणगीदारांच्या इच्छेनुसार नाव देण्याची योजना समिती राबवत आहे. या नव्या प्रकल्पासाठी दानशूरांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. संपर्क – info@samiti.org, मोबाईल – ९४०४८५५५३०.