पुणे: लॉकडाऊनवेळी मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांत झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या अनेक गावांतील माणसांचे परत स्थलांतर झाले आहे. रिव्हर्स मायग्रेशन म्हणजे “खेड्याकडे चला” हा वनराईच्या कामाचा मोठा पैलू आहे. याद्वारे गावातील व्यक्तींना गावामध्येच रोजगार निर्माण होऊन गावाचा विकास कसा साधता येईल यावर वनराई भर देत आहे. गावातील मुलभूत प्रश्न सोडविणे गरजेचे असून वनराई संस्था ग्रामीण विकासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. गावातील पाणी प्रश्न, शिक्षण आणि आरोग्य प्रश्न तसेच लोकांचे उत्पन्न कसे वाढेल यासाठी काम सुरू आहे. प्रत्येक संकटात संस्थेचे कार्यकर्ते सातत्याने झोकून काम करत असतात. त्यामुळे सर्व संस्थानी एकत्र येऊन काम केले तर सगळया संस्थेचे ज्ञानात भर आणि ताकद वाढेल. समाजाची नाळ जोडलेली आहे ती तुटता कामाने ही महत्त्वाची बाब लक्षात ठेले पाहिजे.”असे मत वनराई संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी रविवारी व्यक्त केले.
अजिंक्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित “राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात” वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांना ‘समाजरत्न पुरस्कार’ देण्यात आला यावेळी ते बोलत होते. तसेच माजी राज्य जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, राज्याचे माजी तुरुंग महानिरीक्षक विठ्ठल जाधव, महाएनजीओ फेडरेशनचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांच्या हस्ते पुरस्कार पुरस्काराचे वितरण झाले. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या वीस जणांना ‘समाजरत्न पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. यावेळी महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा माधुरी सहस्त्रबुद्धे, अजिंक्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष धोंडीराम जवान आदी उपस्थित होते.
धारिया म्हणाले, हा पुरस्कार माझा सन्मान नसून गावा गावात जे माझे सहकारी काम करतात त्यांचा हा बहुमान आहे. तसेच लहान मुलांमध्ये आणि शाळेतील मुलांमध्ये पर्यावरणबद्दलचे संस्कार घडावे यासाठी गेली २० वर्ष विविध स्पर्धेचे आयोजन करून पर्यावरणाविषयी जनजागृती केली जाते.
प्रा. राम शिंदे म्हणाले, कोरोनाच्या महामारी मध्ये संपूर्ण राज्य, देश, जग कोरोनाग्रस्त झाले होते. शासन आणि प्रशासन काम करत असताना विविध सामाजिक संस्थाने सातत्याने लोकांच्या अडचणी समजुन घेऊन त्यांना शक्य तेवढी मदत केली. त्यामुळे समाजातील विविध संघटनांचे काम कौतुकास्पद आहे. जीवनात अनेक प्रसंग येतात आणि जातात त्यातून माणूस बऱ्याच गोष्टी शिकतो.”
विठ्ठल जाधव म्हणाले, कोरोनाच्या काळात संपूर्ण राज्यात-परराज्यामध्ये विविध संस्थानतर्फे अन्न धान्य वाटप, सॅनिटाईज, मास्क, रक्तदाब शिबिरे आयोजित करून मदत करण्याचा प्रयत्न केला. यामुळे या विविध सामाजिक संस्था व्यक्ती मध्ये सामाजिक संवेदना आणि माणुसकी जिवंत आहे याची जाणिव होते. हे चांगलं समाज रचनेसाठी चांगल्या समाज जीवनासाठी आवश्यक आहे. या संस्थेचे काम हे तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. जीवनामध्ये स्वतःसाठी काय मिळवले यापेक्षाही दुसऱ्यासाठी काय करू शकलो यांचा आनंद खुप मोठा आहे.
शेखर मुंदडा म्हणाले, कोरोनाच्या काळात महाराष्ट्रात फेडरेशनसह सर्व सामाजिक संस्था एकत्रित करून तीन लाख लोकांना मदत दिली. त्यामुळे सर्व संस्था एकत्र येऊन काम केले पाहिजे. त्यामुळे अधिक गरजूंना मदत करण्यासाठी सोपे होईल. जेव्हा एखाद्या पुरस्काराने आपण सन्मानित होत असतो त्यावेळेस अजून काम करण्याचा उत्साह आणि जबाबदारी वाढते.