पुणेकरांच्या हितासाठी राजकारण बाजूला ठेवून काम व्हावे

पुणेकरांच्या हितासाठी राजकारण बाजूला ठेवून काम व्हावे

पुणेकरांच्या हितासाठी राजकारण बाजूला ठेवून काम व्हावे
अजित पवार यांचे मत; डॉ. श्रीकांत गबाले व मंजुश्री पारसनीस लिखित ‘आंबील ओढा’ पुस्तकाचे प्रकाशन
 
पुणे : “गेल्या काही वर्षात अधिकारी आणि राजकारण्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे अनेक विकास प्रकल्पाचा भुर्दंड व त्रास पुणेकरांना सोसावा लागला आहे. तरीही पुणेकरांनी संयम दाखवत नव्या प्रकल्पांना स्वीकारले आहे. त्यांच्या सहनशीलतेला सलाम करायला हवा. पुणेकरांचे हित लक्षात घेऊन पर्यावरणाचा ऱ्हास न होता, चांगले प्रकल्प राबविण्यासाठी ‘मलाच सगळे समजते’ हा अहंकार व आपापसांतील राजकारण बाजूला ठेवून तज्ज्ञांचा सल्ला घेऊन काम करायला हवे,” असे मत महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले.
 
ग्राफियाज सोल्युशन्स आणि वंचित विकास यांच्यातर्फे भौगोलिक माहिती प्रणालीचे संशोधक डॉ. श्रीकांत गबाले व मंजुश्री पारसनीस लिखित ‘आंबील ओढा – बॅबलींग ब्रुक टू नॅस्टी ड्रेन’ या संशोधनात्मक पुस्तकाचे प्रकाशन अजित पवार यांच्या हस्ते झाले. डी. पी. रस्त्यावरील सिद्धी गार्डनमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, देणगीदार दत्ता पुरोहित, वंचित विकासच्या मीना कुर्लेकर आदी उपस्थित होते.
 
अजित पवार म्हणाले, “आंबील ओढा हा पुण्याचा महत्वाचा घटक आहे. आज तो अनेक समस्यांनी ग्रासलेला आहे. विकासाच्या नावाखाली अनेक अशास्त्रीय कामे होत आहेत. अधिकारी योग्य सल्ला देत नाहीत किंवा राजकारणी त्यांचा सल्ला ऐकत नाहीत, अशा स्थितीत प्रकल्पांना विलंब होणे, त्यात चुका होणे आणि त्यातून शहराचा बकालपणा वाढणे सुरु आहे. पुणेकरांना परवडणारे आणि त्यांच्या हिताचे प्रकल्प राबवायला हवेत.”
 
“टेकड्या हे पुण्याचे वैभव आणि सौंदर्य आहे. बाहेरून पुण्यात काम-धंद्यासाठी आलेल्या लोकांकडून टेकड्यांवर झोपड्या टाकल्या जातात. राजकीय आशीर्वादाने त्या अधिकृत व्हायला लागतात आणि नियोजन कोलमडते. पर्यावरणाची हानी होते. हे टाळण्यासाठी अतिक्रमण करणारे आणि चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला पाहिजे. तसे झाले तर सगळे वठणीवर येतील,” असेही अजित पवार यांनी नमूद केले.
अजित पवार पुढे म्हणाले की, “राजकारण्यांनी आणि अधिकाऱ्यांनी जाबदारीने काम करायला हवे. वेळप्रसंगी तज्ज्ञ मार्गदर्शकांचा सल्ला घेऊन काम करावे. जनतेच्या रेट्यापुढे राजकारण्यांना झुकावे लागते. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या नावाखाली होणाऱ्या चुकीच्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत. निसर्गाच्या इशाऱ्यांना आपण गांभीर्याने घेऊन योग्य ते बदल करायला हवेत. त्यासाठी शालेय जीवनापासूनच पर्यावरणविषयक अभ्यास शिकवला पाहिजे.”
 
कुणाल खेमनार म्हणाले, “पर्यावरण, पूर परिस्थितीवर काम करणार्‍या अनेक संस्था सोबत आहेत. खळाळता झरा असणारा ओढा नाला कसा झाला, याचे शास्त्रीय लेखन या पुस्तकात आहे. ओढ्याच्या सुधारणेसाठी शास्त्रशुद्ध उपाययोजना यात सुचवल्या आहेत. त्याचा प्रशासनाला चांगला उपयोग होईल. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे, यासाठी याचा मराठी अनुवाद व्हायला हवा. या पुस्तकात मांडलेल्या उपाययोजना राबविण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन देतो.”
 
पुस्तकाविषयी बोलताना डॉ. श्रीकांत गबाले म्हणाले, “गेल्या १० वर्षांपासून आंबील ओढा विषयावर काम करत आहे. भौगोलिक माहिती प्रणाली व दूरसंवेदनाचा वापर करून शहरातील पाणवठे, नैसर्गिक प्रवाह, झरे, भौगोलिक स्थिती, भूशास्त्र, भूगर्भातील परिस्थिती, पावसाचे मापदंड, जैविक घटकांशी संबंध, परिसरातील वाढती लोकसंख्या, सद्यस्थितीत महाराष्ट्रामध्ये लागू असलेल्या एकीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार नैसर्गिक प्रवाहासाठीचे नियम व या संबंधित इतर समस्यांचा उहापोह या पुस्तकात केला आहे.”
 
मंजुश्री पारसनीस म्हणाल्या, या परिसरात राहत असून, त्यांचा जैवविविधता, पर्यावरण शास्त्रावर सखोल अभ्यास आहे. २०१९ मध्ये आलेल्या पुरानंतर आपल्या ज्ञानाचा उपयोग करून आंबील ओढ्यातील जैवविविधता आणि पर्यावरण शास्त्र या अनुषंगाने लेखन केले आहे.
 
सुनीता पुरोहित यांच्या स्मरणार्थ दत्ता पुरोहित यांची या पुस्तकाच्या छपाईचा खर्च केला आहे. पुरोहित यांनीही आपले मनोगत मांडले. मीना कुर्लेकर यांनी सूत्रसंचालन केले. अक्षय कुर्लेकर व श्रीराज जाखलेकर यांनी स्वागत प्रास्ताविक केले. डॉ. श्रीकांत गबाले यांनी आभार मानले. 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *