आयुर्वेद ‘सोरायसिस’सारख्या गंभीर आजारावर प्रभावी

आयुर्वेद ‘सोरायसिस’सारख्या गंभीर आजारावर प्रभावी

आयुर्वेद ‘सोरायसिस’सारख्या गंभीर आजारावर प्रभावी
केरळचे वैद्य गोपाकुमार यांचे प्रतिपादन; कायायुर्वेदतर्फे ‘कायाकेशकल्पना’वर ज्ञानसत्राचे आयोजन

पुणे : “सोरायसिस आजार गंभीर असला, तरी आयुर्वेदात त्यावर अनेक उपचार आहेत. आयुर्वेद शास्त्रातील पंचकर्म, अग्निकर्म, शुद्धीकरण अशा विविध थेरपीने सोरायसिसला समूळ नष्ट करता येते. सोरायसिस यांसारख्या त्वचारोगावर आयुर्वेदशास्त्र प्रभावीपणे ठरत आहे,” असे प्रतिपादन केरळ येथील वैद्य गोपाकुमार यांनी केले.

वैद्य हरिश पाटणकर यांच्या कायायुर्वेदतर्फे आयोजित ‘कायाकेशकल्पना’ या विषयावरील ज्ञानसत्रात गोपाकुमार बोलत होते. ‘आयुर्वेद व त्वचाविकार’ यावर वैद्य गोपाकुमार यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवी दिल्ली येथील भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाचे सदस्य (बोर्ड ऑफ आयुर्वेद) डॉ. अतुल वारस्ने होते. प्रसंगी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद, जयपूरचे प्राध्यापक डॉ. पवनकुमार गोदतवार, वैद्य हरीश पाटणकर, डॉ. स्नेहल पाटणकर आदी उपस्थित होते. 
  
‘एनआयए’ येथील द्रव्यगुण व सौंदर्य विभागाच्या प्रमुख डॉ. मिता कोटेचा यांच्या पुढाकाराने, तसेच रोगनिदान विकृती विभाग आणि राष्ट्रीय आयुर्वेद संस्थानचे संचालक डॉ. संजीव शर्मा यांच्या सहकार्याने कायायुर्वेद व केशायुर्वेद यांच्यासोबत जयपूरमध्ये नुकत्याच झालेल्या सामंजस्य कराराचे डॉ. गोदतवार व डॉ. स्नेहल पाटणकर यांनी हस्तांतरण केले. या करारामार्फत देशभरातील त्वचा रुग्णांसाठी कायायुर्वेद येथे संशोधन व निदान पद्धती विकसित होणार आहे.
 
डॉ. अतुल वारस्ने यांनी अध्यक्षीय भाषणात कायायुर्वेद संकल्पना व वैद्य पाटणकर यांचे विशेष कौतुक केले. आयुर्वेदामध्ये शैक्षणिक क्षेत्रात विशेष बदल घडविणे गरजेचे असून, यामध्ये वैद्यांचे कार्य महत्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. गोदतवार यांनी आयुर्वेदामध्ये संशोधनाचे महत्व अधोरेखित करताना कायायुर्वेद ही संस्था त्वचाविकार क्षेत्रात नवीन क्रांती आणू शकते, असे सांगितले. 
 
वैद्य हरिश पाटणकर यांनी केशायुर्वेद व कायायुर्वेद संशोधन संस्थांतून होत असलेल्या नव्या संशोधनाची माहिती दिली. देशभरातून विविध वैद्य व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत-प्रास्ताविक डॉ. स्नेहल पाटणकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. यी मेन्द्र व डॉ. आंचल यांनी केले. आभार डॉ. विवेक आंबरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *