पुणे: उन्हाचा कडाका, महागाईचा भडका आणि बेरोजगारीचा विळखा घट्ट होत असल्याने मजूर अड्ड्यावरील महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला. गॅस सिलिंडरने हजारी पार केली, आता पुन्हा चुली पेटवून स्वयंपाक करायचा का, त्यासाठी सरपण कोठून आणायचे, हाताला काम नाही, पोटाला उपाशी किती दिवस ठेवायचे, मुला-बाळांना शिक्षण कसे द्यायचे, असे एक ना अनेक प्रश्न मजूर वर्गाने उपस्थित केल्याचे युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी सांगितले.
सुरवसे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा पार झाला. आणखी दोन टप्प्यात निवडणुका होतील. मतदारांवर दबाव आणि आमिष दाखविण्याचा प्रकार सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. एक दिवसाची पोटपूजा होईल, पण पुढे पाच वर्षे मजूर वर्ग कसे पोट भरणार, मुलांना शिक्षण कसे देणार ही मोठी शोकांतिका आहे. सत्ताधाऱ्यांकडून साम, दाम, दंडाचा वापर केला जात असल्याने सामान्य जनता भयभीत झाली आहे.” विरोधकांना संपविण्याचा घाट सत्ताधारी पक्षाने घाटला आहे, त्यामुळे सामान्य कार्यकर्त्याने आता दाद कोणाकडे मागायची, अशी विचारणा त्यांनी केली.
गावाकडे दुष्काळजन्य परिस्थिती, प्यायलाच पाणी नाही, तर शेतीला नाही म्हणून नापिक झाली. शिक्षण नाही म्हणून नोकरी नाही, त्यामुळे पोटापाण्यासाठी शहराकडे आलो, तर शहरातही रोजगार मिळत नाही. आम्हाला फुकट काही नको, हाताला काम द्या, त्यातून आम्ही सन्मानाने जगू, अशी भावना ज्ञानेश्वर कांबळे यांनी व्यक्त केली.
उंड्री चौकातील मजूर अड़्ड्यावर सुमारे तीन-साडेतीनशे महिला पुरुष रोजगारासाठी भल्या सकाळी येऊन थांबतात. हा वर्ग बांधकामावर काम करमारा आहे. ठेकेदार त्यांच्या गरजेनुसार मजुरांना काम देतो. मात्र, अद्याप बांधकाम व्यवसायाने उडी घेतली नसल्याने दररोज हाताला काम मिळत नाही. आठवड्यातून तीन-चार दिवस काम मिळते, तर इतर दिवशी कडाक्याच्या उन्हात डोळ्यातील पाण्यावर तहान भागवावी लागत आहे, अशी परिस्थिती मजूर अड्ड्यावरील कामगारांची झाली आहे. शेतकरी-कष्टकरी आणि मजुरांवर निष्कामी सरकारमुळे उपासमारीची वेळ आल्याची तक्रार रोहन सुरवसे-पाटील यांनी केली.