पुणे: हिंदुस्थान अँटिबायोटिक्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि ज्येष्ठ रसायनशास्त्र अभियंते यशवंत घारपुरे यांना वयाच्या ९१ व्या वर्षी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल इंजिनिअर्सतर्फे सन्माननीय फेलोशिप (ऑनररी फेलोशिप) प्रदान करण्यात आली. जालंधर (पंजाब) येथे नुकत्याच झालेल्या ‘केमकॉन २०२४’मध्ये घारपुरे यांचा सन्मान करण्यात आला. घारपुरे सध्या पुण्यात स्वतःचा व्यवसाय चालवत आहेत. यावेळी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष सुनील ठक्कर, जालंधर एनआयटीचे संचालक प्रा. बिनोदकुमार कनौजिया, हेरिटेज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप कुमार अग्रवाल, आयव्हीएल धुनेश्वरी पेट्रोकेम इंडस्ट्रीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिश्वनाथ चटोपाध्याय, आयसीटी मुंबईचे माजी कुलगुरू प्रा. जी. डी. यादव आदी उपस्थित होते.
केमिकल इंजिनिअरींग क्षेत्रात घारपुरे यांनी गेल्या सात दशांकापासून दिलेल्या योगदानाचा सन्मान म्हणून त्यांना ही फेलोशिप प्रदान करण्यात आली आहे. त्यामध्ये जागतिक तंत्रज्ञानासाठीच्या निविदांची तपासणी करणे, यशस्वीरीत्या अनेक प्रकल्प राबवणे आणि कार्यान्वित करणे, आयात केलेल्या दोन तंत्रज्ञानांचे रिव्हर्स इंजिनीअरिंग करणे, स्वदेशी विकसित तंत्रज्ञानांवर आधारित प्रकल्पांची अंमलबजावणी करणे आणि इतर अनेक महत्त्वाची कामगिरी समाविष्ट आहे.
यशवंत घारपुरे यांना लेखनाची विशेष आवड असून त्यांनी १९५५ मध्ये महाविद्यालयीन मासिकात ‘स्पेस ट्रॅव्हल’ या विषयावर पहिला लेख लिहिला होता. त्यानंतर त्यांनी ३०० हून अधिक लेख लिहून प्रकाशित केले आहेत. ‘वॉलंटरी एक्झिक्युटिव्ह्स फोरम ऑफ इंडिया’ (व्हीईएफआय) आणि ‘टेक्नॉलॉजी ट्रान्सफर असोसिएशन’ (टीटीए) या दोन स्वयंसेवी संस्थांची स्थापनाही घारपुरे यांनी केली आहे. गेल्या वर्षी, ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल इंजिनिअर्स’च्या पुणे शाखेतर्फे त्यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.