‘अकौंटन्सी’चा प्रवास संग्रहालयाच्या रूपात

‘अकौंटन्सी’चा प्रवास संग्रहालयाच्या रूपात

पाच महाविद्यालयात ‘आयसीएआय’ पुणे शाखेने उभारले ‘अकौंटन्सी म्युझियम’

पुणे : दि इन्स्टिट्यूशन ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलच्या (डब्ल्यूआयआरसी) पुढाकारातून आयसीएआय पुणेतर्फे शहरातील पाच महाविद्यालयात ‘अकौंटन्सी म्युझियम’ उभारले आहे. नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स, हडपसर येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालय, रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी महाविद्यालयातील ‘अकौंटन्सी म्युझियम’चे उद्घाटन ‘आयसीएआय’च्या पुणे शाखेचे अध्यक्ष व खजिनदार सीए समीर लड्डा यांच्या हस्ते झाले. प्रसंगी उपाध्यक्ष व सचिव सीए काशिनाथ पाठारे, सीए अमृता कुलकर्णी आदी उपस्थित होते.

शिवाजीनगर येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचालित मॉडर्न कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज व डेक्कन परिसरातील मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स या महाविद्यालयात ‘अकौंटन्सी म्युझियम’चे ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे यांच्या हस्ते झाले. प्रसंगी ‘आयसीएआय’च्या पुणे शाखेचे अध्यक्ष व खजिनदार सीए समीर लड्डा, माजी अध्यक्ष सीए अभिषेक धामणे, सीए अमृता कुलकर्णी  उपस्थित होते. पाच महाविद्यालयात असे म्युझियम उभारणारी ‘आयसीएआय’ पुणे ही भारतातील पहिलीच शाखा ठरली आहे.

वाडिया महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वृषाली रणधीर, उपप्राचार्य डॉ. प्रकाश चौधरी, मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त डॉ. मनोहर सानप, प्राध्यापक सीए जयश्री वेंकटेश, अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके, उपप्राचार्य डॉ. ए. बी. माने, प्लॅस्टमेन्ट सेल व वाणिज्य शाखेचे प्रमुख प्रा. डॉ. जी. पी. सातव, एस. एम. जोशी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. अर्जुन भागवत, समन्वयक डॉ. ज्योती किर्वे, मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. झुंजारराव, उपप्राचार्य व वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. ए. व्ही. कांबळे, प्रा. राहुल जाधव, सीए प्रा. रसिका दाते, मराठवाडा मित्र मंडळाचे प्राचार्य डॉ. देविदास गोल्हार, विभागप्रमुख प्रा. सारंग एडके, प्रा. सुशील गंगणे यांनी ‘अकौंटन्सी म्युझियम’ उभारण्यात मोलाचे सहकार्य केले आहे.

सीए समीर लड्डा म्हणाले, “देशाच्या आर्थिक विकासात योगदान देणाऱ्या ‘आयसीएआय’ ही सर्वात मोठी प्रोफेशनल बॉडी असलेली जगातील दुसऱ्या क्रमांकाची संस्था आहे. या संस्थेचे पश्चिम विभागीय कार्यालय मुंबई येथे असून, पाच विभागीय मंडळात तेही सर्वात मोठे विभागीय मंडळ आहे. ज्यामध्ये १,२०,००० सनदी लेखापाल, तर १,८०,००० सीए करणारे विद्यार्थी सभासद आहेत. विद्यार्थ्यांच्या व सनदी लेखापालांच्या प्रगतीसाठी सातत्याने नवोपक्रम राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयांमध्ये ‘अकौंटन्सी म्युझियम’ स्थापन करण्यात येत आहे. मुख्य ‘अकौंटन्सी म्युझियम’ नोयडा येथील आयसीएआय भवनमध्ये आहे.”  भारतासह जगभरात सनदी लेखापालांना विविध क्षेत्रात असलेल्या संधींबद्दल चंद्रशेखर चितळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

काय पाहाल ‘अकौंटन्सी म्युझियम’मध्ये
प्राचीन काळापासून आजपर्यंत अकौन्टसीमध्ये होत गेलेली प्रगती, व्यवहाराच्या बदलत्या पद्धती, विकसित होत गेलेल्या प्रणाली, जुन्या काळातील हस्तलिखिते, शिल्पे, जगभरातील संग्रहालयांमध्ये साठवलेल्या कलाकृतींची छायाचित्रे, महत्त्वाची जर्नल्स, नाणी, पदके, पहिल्या अकाउंटन्सीच्या प्रतिमा, जुने ताळेबंद इत्यादि या म्युझियममध्ये पाहायला मिळणार आहे. सुमेरियन, हडप्पा संस्कृतीच्या काळातील चलने, पहिले भारतीय नाणे, मोहरा, हस्तलिखित धनादेश, खातेपुस्तक, मुनीमची परंपरा आदी गोष्टींचा यात समावेश असून, नव्या पिढीला अकौंटसीबद्दल माहिती व्हावी, गोडी लागावी व अकाउंटचा इतिहास, व्यवहाराच्या पद्धती समजून घेता याव्यात, यासाठी हे म्युझियम उपयुक्त ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *