पुणे, दि. २२ – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीतर्फे एक लाख वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. बुधवार, दि. २५ जून २०२५ रोजी माऊलींची पालखी वाल्हे येथे मुक्कामास असणार आहे. वाल्हे मुक्कामी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी आषाढी वारीनिमित्त महाभोजन व्यवस्था केली जाणार आहे. महाप्रसाद म्हणून चपाती, भाजी, वरणभात, गोड पदार्थ शिरा-बुंदी समाविष्ट आहे, अशी माहिती राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीचे राज्यप्रमुख हभप विठ्ठलआबा मोरे ( Habhp Vitthalaba More, state chief of the Nationalist Spiritual and Warkari Alliance) यांनी दिली आहे.
हभप विठ्ठलआबा मोरे म्हणाले, “माउलींचा पालखी सोहळा देशभरातून येणाऱ्या वारकऱ्यांसाठी भक्तियोग असतो. भक्तिरसात न्हाऊन निघणाऱ्या, पायी चालत पंढरीच्या दिशेने एकेक पाऊल टाकणाऱ्या वारकरी बंधू-भगिनींसाठी यंदा महाप्रसादाचे आयोजन केले आहे. सुमारे एक लाख वारकऱ्यांना सकस, ताजे व पौष्टिक भोजन देण्यासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी, स्वयंसेवक मनोभावे तयारी करत आहेत. वाल्हे येथील पालखी तळावर ही व्यवस्था उपलब्ध होणार असून, काटेकोरपणे नियोजन केले जात आहे.”