पंकज शहा यांचे मत; ‘रोटरी’तर्फे ससून रुग्णालयात राज्यातील पहिल्या व्हाईस अँड स्पीच डायग्नोस्टिक्स आणि रिहॅब क्लिनिकचे लोकार्पण
पुणे : “ससून सर्वोपचार रुग्णालय सामान्यांचा आधार आहे. राज्यभरातील लोक येथे उपचारासाठी येतात. या क्लिनिकमुळे बोलण्यात अडचण असणाऱ्या रुग्णांना स्पीच थेरपी व संबंधित उपचार मिळणार असून, त्यांचा ‘आवाज’ आणखी सक्षम होणार आहे,” असे प्रतिपादन रोटरी क्लबचे प्रांतपाल पंकज शहा यांनी केले.
ससून सर्वोपचार रुग्णालयात रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रजच्या पुढाकारातून सुरू होत असलेल्या राज्यातील पहिल्या व्हाईस अँड स्पीच डायग्नोस्टिक्स आणि रिहॅब क्लिनिकचे उद्घाटन व लोकार्पण शहा यांच्या हस्ते झाले. प्रसंगी ‘ससून’चे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे, रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रजचे अध्यक्ष पुष्कराज मुळे, डॉ. समीर जोशी, डॉ. मुरलीधर तांबे, डॉ. हरीश टाटिया, डॉ. अजय तावरे, डॉ. राजेश कार्यकर्ते, तसेच तायकिशा इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक हेमंत मकवाना, श्रीमती आशा मकवाना, असिस्टंट गव्हर्नर धनश्री जोग, मीना घळसासी, प्रकल्प संचालक विवेक कुलकर्णी यांच्यासह प्रकल्पात सहभागी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
या क्लिनिकचा आर्थिक मागास प्रवर्गातील लोकांना याचा लाभ होणार असून, तोतरे बोलणारी मुलं, आवाजावर परिणाम होणाऱ्या विविध घटकांतील लोकं उदा: फेरीवाले, कलाकार, गायक, शिक्षक, इत्यादी तसेच बोलण्यात अडचणी असणाऱ्या विविध व्यक्ती व कर्णबधिर मुलं या क्लिनिकमध्ये उपचार घेऊ शकतील. याचबरोबर घशाच्या कॅन्सरचे प्राथमिक अवस्थेत असताना निदान होणे शक्य होणार आहे. अतिशय आधुनिक यंत्र प्रणाली येथे बसविण्यात आली असून, तपासणी व त्याला अनुसरून स्पीच थेरपी, शस्त्रक्रिया किंवा अन्य उपचार करता येणार आहेत.
पंकज शहा म्हणाले, “बोलण्यातील अडचणीसारख्या हटके विषयावर रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रजने काम केल्याचा आनंद वाटतो. या क्लीनिकमध्ये लहान, तोतरे बोलणारी, आवाजाच्या समस्या असणाऱ्या लोकांना याचा लाभ होईल. ससूनसारख्या सार्वजनिक हॉस्पिटलमध्ये चालू करून रुग्णाची खूप मोठी सेवा पुण्यामध्ये होणार आहे. जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घयावा आणि उपयोग करावा.”
डॉ. विनायक काळे म्हणाले, “सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून अनेक संस्था ससून रुग्णालयाला अत्याधुनिक आणि सक्षम बनवत आहेत. अधिकाधिक रुग्णांना चांगल्या आरोग्यसेवा पुरविण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. या क्लिनिकमुळे समाजातील हजारो रुग्णांना बोलण्याच्या समस्येवर उपचार मिळू शकणार आहेत. समाजातील दातृत्व भावाने काम करत असलेल्या व्यक्ती, संस्था यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.”
पुष्कराज मुळे म्हणाले, “आज महाराष्ट्रातले पहिले ‘साऊंड अँड स्पीच डायग्नोस्टिक अँड रिहॅब क्लिनिक’चे लोकार्पण केले आहे. ससून रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना या सुविधेचा लाभ होईल, याचा विश्वास आहे. समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आमचा यापुढेही प्रयत्न राहील.”
सूत्रसंचालन विद्या यांनी केले. आभार नमिता नाईक यांनी मानले.