याप्रसंगी व्हीके ग्रुपचे संस्थापक आर्कि. विश्वास कुलकर्णी, संचालिका आर्कि. अनघा पुरोहित-परांजपे, संचालिका सौ. अपूर्वा कुलकर्णी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या प्रदर्शनाला अधिकाधिक पुणेकरांनी, विद्यार्थ्यांनी, युवा व्यावसायिकांनी भेट देऊन वास्तुकलेचा आविष्कार अनुभवावा, अशी विनंती संयोजकांनी केली आहे.
आर्कि. हृषीकेश कुलकर्णी म्हणाले, “व्हीके ग्रुपने आजवर दगडूशेठ गणपती मंदिरापासून ते सौदी अरेबियातील ‘द लाईन’ मेट्रोसिटी, लोणावळ्यातील ग्रीन बटरफ्लाय हिलस्टेशनपासून नाशिकमधील ग्रेप कंट्री रिसॉर्ट आणि पुण्यासह देशविदेशात अनेक टाऊनशिप्स, सरकारी प्रकल्पाच्या युनिक डिझाईन्स साकारल्या आहेत. या सर्व डिझाईन्स या प्रदर्शनात पाहता येणार आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन येत्या शुक्रवारी (दि. २१) दुपारी ३ वाजता राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती राहणार असून, ते आपले विचार मांडणार आहेत.”
“उद्घाटन सोहळ्यावेळी पुण्याचे शहरीकरण व विकासाचे विविध पैलू यामध्ये महत्वाचे योगदान देणाऱ्या संस्थांना ‘लीडर्स ऑफ चेंज’ म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये पुण्यातील मॉडेल समजले जाणारे मगरपट्टा सिटी कॉर्पोरेशनचे अध्यक्ष सतीश मगर, १२५ हुन अधिक वर्षांचा शैक्षणिक वारसा असलेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद रावत, पुण्यातील प्रसिद्ध पीएनजी ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ, पुण्यातील सांस्कृतिक प्रतीक सवाई गंधर्व या वार्षिक उत्सवाचे संचालक मुकुंद संगोराम यांना निमंत्रित केले आहे. त्यानंतर होणाऱ्या ‘बिल्डिंग द सिटी ऑफ टुमारो’ या विषयावरील चर्चासत्रात ‘क्रेडाई’चे अध्यक्ष रणजित नाईकनवरे, सर जेजे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्राचार्य राजीव मिश्रा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्सच्या पुणे चॅप्टरचे चेअरमन विकास अचलकर आपले विचार मांडणार आहेत. यावेळी ‘लंडन ऑलिम्पिक पार्क’ हा माहितीपट दाखवण्यात येणार आहे,” असे कुलकर्णी यांनी नमूद केले.
आर्कि. अनघा परांजपे-पुरोहित म्हणाल्या, “दुसऱ्या दिवशी दुपारी २.३० ते ८ या वेळेत ‘आर्किटेक्चरल कलात्मक चित्रीकरण’ या विषयावर ‘द आर्च आर्ट’च्या श्वेता हिंगणे यांची कार्यशाळा होणार आहे. ‘सस्टेनेबल सिटीज अँड डायनॅमिक अर्बन प्लॅनिंग टूल्स’वर निरमा युनिव्हर्सिटीचे संचालक उत्पल कुमार शर्मा यांचे, तर ‘टाऊन प्लॅनिंग स्कीम्स-इफेक्टिव्ह अर्बन प्लॅनिंग मॉडेल फॉर लिव्हेबल कम्युनिटीज’वर व्हीके ग्रुपचे संचालक विजय साने यांचे सादरीकरण होणार आहे. ‘पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारे सामाजिक उपक्रम’ या विषयावरील चर्चासत्रात वेस्टर्न रूट्सचे जयेश परांजपे, अर्बन स्केचर्सच्या गायत्री गोडसे, अमुक तमुकचे शार्दूल कदम, आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या यशोदा जोशी, ऐसी अक्षरे मासिकाचे प्रकाशक समीर बेलवलकर सहभागी होणार आहेत. ऋषभ पुरोहित व त्यांचे सहकाऱ्यांचा संगीत कार्यक्रम होणार आहे.”
“तिसऱ्या दिवशी दुपारी ३ ते ८ ‘डेटा ड्रिव्हन अर्बनायझेशन’वरील चर्चासत्रात सीआरई मॅट्रिक्सचे अभिषेक किरण गुप्ता, जेएलएल इंडियाचे आर्कि. राहुल वैद्य विचार मांडतील. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे माजी व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित ‘शहरी वाहतुकीचे आधुनिकीकरण: शहराच्या शाश्वत विकासात पुणे मेट्रोचे योगदान’ यावर, तर स्मार्ट सिटी मिशनचे सहसचिव कुणाल कुमार ‘स्मार्ट सिटीज मिशन: यश आणि भविष्यातील दिशा’ यावर आपले विचार मांडणार आहेत. यावेळी ‘रील्स’ स्पर्धेचे पारितोषिक वितरण होईल,” असे सौ. अपूर्वा कुलकर्णी यांनी नमूद केले.