इंडस्ट्री-अकॅडमी यांच्यातील संवाद महत्वाचा

इंडस्ट्री-अकॅडमी यांच्यातील संवाद महत्वाचा

 

आर्कि. ऋषिकेश कुलकर्णी यांचे मत; ‘व्हीके-विद्या सेतू’ कार्यशाळेचे आयोजन

पुणे: “बदलते तंत्रज्ञान, कल्पकता आणि नाविन्यता याचा संगम साधून वास्तुकला, स्थापत्य क्षेत्रातील उत्कृष्ट रचनांसाठी इंडस्ट्री व अकॅडमी यांच्यात नियमित संवाद महत्वाचा आहे. आर्किटेक्चर व पर्यावरणीय क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्ये, तंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी शिक्षण सुरु असतानाच आत्मसात केले आणि प्रात्यक्षिक ज्ञान घेतले, तर भविष्यात चांगले आर्किटेक्ट तयार होतील,” असे मत व्हीके ग्रुपचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आर्कि. ऋषिकेश कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

व्हीके ग्रुपच्या ५१ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून अर्थपूर्ण ज्ञानाचे आदानप्रदान करत इंडस्ट्री व अकॅडमी यांच्यातील संबंध अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने आर्किटेक्चर महाविद्यालयांच्या प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी ‘व्हीके-विद्या सेतू’ या विशेष कार्यशाळेचे ‘पुणे-सिटी विदिन द कॅम्पस’ या संकल्पनेवर ही विशेष कार्यशाळा आयोजिली होती. व्हीके ग्रुपने केलेल्या प्रकल्पांचे प्रदर्शन लवकरच भरविण्यात येणार असून, त्याचे निमंत्रण या सर्वांना देण्यात आले.

सेनापती बापट रस्त्यावरील व्हीके ग्रुपच्या प्रांगणात झालेल्या कार्यशाळेवेळी संचालिका अनघा परांजपे-पुरोहित, पूर्वा केसकर, अपूर्वा कुलकर्णी, अतुल्या आबे आदी उपस्थित होते. १५ आर्किटेक्चर, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, एन्व्हायरॉन्मेंटल महाविद्यालयातील ६० पेक्षा अधिक प्रतिनिधी कार्यशाळेत सहभागी झाले. आर्किटेक्चर, इंटेरियर डिझाईन, इंजिनिअरिंग आणि एन्व्हायर्नमेंटल कॉलेजच्या प्रतिनिधींनी त्यांच्या संस्थेत सुरु असलेल्या प्रकल्पांवर सादरीकरण केले.

भविष्यात शहरे कशी असावीत, या संकल्पनेवर विविध डिझाईन्स विद्यार्थ्यांनी मांडले, तर काहींनी चर्चासत्रात सहभागी होत आपल्या कल्पना सादर केल्या. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या टीमने पुण्यातील फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, स्वारगेट भागाच्या सर्व्हेबद्दल सादरीकरण केले. डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरने पथनाट्य, अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चरने ‘इंटरमॉडेल ट्रान्झिट हब शिवाजीनगर’चे सादरीकरण केले. ‘बायोफिलिया इन वर्किंग प्लेस’वर सिंहगड कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी, तर ब्रिक्स कॉलेजचे कचऱ्याचे व्यवस्थापन, फर्ग्युसन महाविद्यालयाने हरित परिसर, निकमार महाविद्यालयाने बाणेर मेट्रो स्टेशन, आयोजन महाविद्यालयाने माण म्हाळुंगे टाउनशिप आणि एस. बी. पाटील कॉलजेच्या वतीने मोशी सिटीचे विश्लेषण केले.

 

आर्कि. ऋषिकेश कुलकर्णी म्हणाले, “पुण्यातील अनेक प्रमुख वास्तूंचे कल्पक डिझाईन बनवण्याचे काम गेल्या ५० वर्षात व्हीके ग्रुपने केले आहे. या कार्यशाळेमुळे शिक्षण संस्थांनी केलेल्या सर्व्हे व संशोधनाची एकत्रित माहिती संकलित झाली पाहिजे. तसेच शहरातील प्रमुख समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्वसमावेशक कार्यपद्धती विकसित झाली पाहिजे. इंडस्ट्री आणि अकॅडमीक्स यांच्यातील संशोधन कार्यामुळे शासकीय, निमशासकीय संस्थांकडे संशोधन सादर करण्यास सोयीचे झाले पाहिजे.”

 

विद्या प्रतिष्ठान स्कुल ऑफ आर्किटेक्चर, आयोजन स्कुल ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन, सतीश मिसाळ फाउंडेशनचे ब्रिक स्कुल ऑफ आर्किटेक्चर, पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन, एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे स्कुल ऑफ आर्किटेक्चर, पुणे जिल्हा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, फर्ग्युसन महाविद्यालय, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट निकमार आणि श्री बालाजी युनिव्हरसिटी या महाविद्यालयांच्या प्रतिनिधीनी कार्यशाळेत सादरीकरण व विचार मांडले. अनघा परांजपे-पुरोहित यांनीही कार्यशाळेत मार्गदर्शन केले. अतुल्या आबे यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. अपूर्वा कुलकर्णी यांनी आभार मानले.

 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *