‘वंचित विकास’तर्फे अभिरुची, किशोरी वर्ग, फुलवातील बाल कलाकारांसाठी अभिनय स्पर्धा
पुणे : संदेसे आते है… यह देश है वीर जवानों का… आलू का चालू बेटा… जिंगल बेल जिंगल बेल… माउली माउली… चला जेजुरीला जाऊ… आंबे कृपा करी… झुबी डुबी झुबी डुबी… आईगिरी नंदिनी… अशा देशभक्ती, भावभक्ती, बालगीतावर ताल धरत, कलाविष्कार सादर करत लहानग्यांनी उपस्थितांची वाहवा मिळवली. निमित्त होते, वंचित विकास संस्थेतर्फे आयोजित सुमनताई शिरवटकर पुरस्कृत अभिनय स्पर्धेचे. सामाजिक विषयांवर नाट्यछटा, नृत्य सादर करत वंचित विकास संचालित अभिरुची वर्ग आणि फुलवातील बालकलाकारांनी धमाल उडवून दिली.
सहकारनगर येथील मुक्तांगण बालरंजन केंद्रात झालेल्या या अभिनय स्पर्धेत संस्थेच्या वेगवेगळ्या वस्त्यामधील ११ अभिरुची वर्गातील मुलांनी, सावित्रीबाई फुले वस्तीतील किशोरी वर्गातील, तसेच लालबत्ती विभागातील फुलवा प्रकल्पामधील मुलांनी सहभाग घेतला. स्पर्धेत ४ ते १४ वयोगटातील दोनशेहून अधिक मुलेमुली सहभागी झाले होते. अप्पर इंदिरानगर, सिंहगड रोड, अंबील ओढा, भवानी पेठ, समर्थ नगर, चुनाभट्टी, अंबिकानगर, सरंगम चाळ, जनता वसाहत, पवननगर, दांडेकरपूल आदी वस्त्यांतील मुले सहभागी झाली होती. सुलोचना शिवचरण, स्नेहल किरतकर्वे , रुपाली भालेकर शीतल खोत, संगीता रणशिंगारे पूनम लंगर, सुरेखा मोरे, योगेश्री लोहार, रेखा परदेशी, मनीषा क्षीरसागर, स्वाती भोसले या ताईंनी मुलांच्या कलांचे दिग्दर्शन केले.
नाट्यछटा, नृत्य, समूहनृत्य, गायन, फॅन्सी ड्रेस आदी प्रकारातील ४० कलाविष्कार सादर केले. यामध्ये हिंदी-मराठी चित्रपट गीते, भावगीते, भक्तीगीते देशभक्तीपर गीतांवर विद्यार्थ्यांनी ताल धरला. ‘मुलगी वाचवा’ असा संदेश देणारे नाटक सादर करत मुलांनी स्त्रीभ्रूण हत्येवर प्रकाश टाकला. तर ‘मागे वळून पाहताना’ हे कोरोनावरील, ‘मला फर्दी झाली’ हे विनोदी नाटक सादर केले. ‘फॅन्सी ड्रेस’मध्ये रंगीबेरंगी फळे, फुले पाहायला मिळाली. उपस्थित मुलांनी आणि पालकांनी कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला. वंचित विकासच्या वतीने मुलांना खाऊवाटप करण्यात आला.
श्रीराम ओक, जयश्री घाटगे, प्रमिला साळवे या स्पर्धेचे परीक्षक होते. संस्थेच्या स्नेहल मसालिया, तेजस्विनी थिटे यांनी स्पर्धेचे संयोजन केले. सुमनताई शिरवटकर या संस्थेच्या देणगीदार आणि स्नेही असून, त्यांनी दिलेल्या देणगीचा वापर मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी व्हावा, अशी त्यांची इच्छा आहे, म्हणून गेल्या पाच वर्षापासून या स्पर्धा घेण्यात येतात. मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते नितीन करंदीकर, वंचित विकासचे पदाधिकारी मीनाताई कुर्लेकर, सुनीता जोगळेकर, देवयानी गोंगले, मीनाक्षी नवले आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन तृप्ती फाटक यांनी केले.