सुषमा चोरडिया यांचे प्रतिपादन; शैक्षणिक क्षेत्रातील अग्रणींचा परिसंवादात सहभाग
पुणे : “संस्थेच्या स्थापनेपासून सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स विद्यार्थ्यांना सर्वोत्तम आणि सर्वांगीण शिक्षण देत आहे. यंदा संस्था रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत असून, या वर्षात मिळालेला सन्मान विशेष आनंददायी आहे. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेत विद्यार्थ्यांना मूल्याधिष्ठित शिक्षण, कमवा आणि शिका, शिष्यवृत्तीच्या योजनेतून आर्थिक सहकार्य, स्टार्टअपना संधी देण्यावर भर दिला जात आहे,” असे प्रतिपादन सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांनी केले.
मुंबईतील ऑर्किड हॉटेल येथे आयोजित नवभारत एजुकेशन समिट आणि पुरस्कार सोहळ्यात सुषमा चोरडिया बोलत होत्या. प्रसंगी राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर, एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटीचे प्र-कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या सहाय्यक उपाध्यक्षा स्नेहल नवलखा यांच्यासह शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ व प्रमुख शिक्षण संस्थाचालक उपस्थित होते. या कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थांना गौरवण्यात आले. यामध्ये सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस, कॉलेज ऑफ फिजिओथेरपीला ‘बेस्ट इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स इन महाराष्ट्र २०२३’ हा सन्मान प्रदान करण्यात आला.
मंगलप्रभात लोढा म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारताला आर्थिक महासत्ता बनविण्याचे आणि कौशल्य विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी प्रयत्न करावेत. केंद्र आणि राज्य सरकार कौशल्य विकास आणि मूल्यावर आधारित शिक्षणावर विशेष कार्यक्रम राबवित आहे. कोणताही रोजगारावर आधारित अभ्यासक्रम सुरु करायचा असेल, तर तो प्रस्ताव राज्य सरकार तात्काळ मंजूर करेल.”
स्नेहल नवलखा म्हणाल्या, “सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस, कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्नित पदवी अभ्यासक्रम शिकवले जातात. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ व्होकेशनल एज्युकेशनचे पदविका आणि प्रशस्तीपत्र अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. संस्थेत शिकून आदर्श डॉक्टर्स समाजात जावेत, यासाठी त्यांना मूल्याधारित शिक्षण देण्यावर संस्थेचा भर आहे. महिला, दिव्यांग, कॅन्सर पीडित तसेच इतरांसाठी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिरे, आरोग्यविषयक जनजागृती, जनजागृती रॅली अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.”