पिंपरी, दि. २३ – वैष्णवीचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात, लवकर निकाल, अजित पवारांचा कस्पटेंना शब्द; IPS सुपेकरांनाही इशारा वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणात फरार आरोपी राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा शशांक हगवणे यांस पोलिसांनी आज पहाटेच्या सुमारास अटक केली.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वैष्णवी हगवणे (Vaishnavi hagwane) हिच्या लग्नात ज्यांच्या हाताने हगवणे कुटुंबीयांना फॉर्च्युनरची चावी देण्यात आली होती त्या अजित पवारांनी (Ajit pawar) वैष्णवीच्या माहेर जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. वैष्णवीच्या वडिलांसोबत फोनवरुन संवाद साधल्यानंतर अजित पवारांनी आज त्यांच्या घरी (Pune) जाऊन आई-वडिलांची भेट घेत संपूर्ण घटना जाणून घेतली. यावेळी, मोठा पोलीस बंदोबस्त कस्पटे कुटुंबीयांच्या घराबाहेर दिसून आला. पीडित कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधत भूमिका व तपासाबाबत माहिती दिली. तसेच, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालेल, याचा लवकर निकाल लागेल असेही अजित पवारांनी सांगितले. तर, वैष्णवीचे मामा सासरे असलेल्या पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनाही अजित पवारांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे.
वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणात फरार आरोपी राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा शशांक हगवणे यांस पोलिसांनी आज पहाटेच्या सुमारास अटक केली. या अटकेनंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता, 28 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दुसरीकडे राजकीय वर्तुळातही या घटनेवरुन संताप व्यक्त होत असून भाजपच्या महिलांनी कोर्टाबाहेर आंदोलन करत, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. आज सकाळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी कस्पटे कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैष्णवीच्या आई-वडिलांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर, माध्यमांशी संवाद साधताना, याप्रकरणी कोणाचीही हयगय केली जाणार नाही, राजकीय हस्तक्षेप होणार नाही असे अजित पवारांनी म्हटले.
घटनेची माहिती मिळताच, मी पिंपरी चिंचवडचे आयुक्त चोबे यांना आदेश दिले होते. कोणाची हयगय करायची नाही, राजकीय हस्तक्षेप होणार नाही. आरोपींना तातडीनं बेड्या ठोकण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, तिघांना आधीचं अटक केली होती, सासरे आणि दिराला आज बेड्या ठोकल्या आहेत. मग मी कस्पटे कुटुंबीयांशी वैयक्तिक बोललो. तपास करणाऱ्या सर्वांना इथंच बोलावलं. तसेच, बाळ ज्यांच्याकडे होते त्या निलेश चव्हाणवर ही कडक कारवाईचे आदेश दिले आहेत, अशी माहिती अजित पवारांनी दिली.