आयुष मंत्रालय आयोजित ‘स्टार्टअप चॅलेंज’ स्पर्धेत संशोधनाला प्रथम पुरस्कार
पुणे : केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या वतीने आयोजित ‘स्टार्टअप चॅलेंज’ या राष्ट्रीय स्पर्धेत पुण्यातील वैद्य हरीश पाटणकर व डॉ. प्रिया गोखले यांना प्रथम पारितोषिक मिळाले. ‘आयुष’ विभागातील नवीन संशोधनाना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजिलेल्या ‘ग्लोबल आयुष इनवेस्टमेंट्स अँड इनोव्हेशन समिट २०२२’ या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डॉ. गोखले यांनी प्रमाणपत्र स्वीकारले.
गुजरातमधील गांधीनगर येथे होत असलेल्या या तीन दिवसीय समिटच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मॉरीशिसचे पंतप्रधान प्रविंद जगनौथ, जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम आदी उपस्थित होते.
जगभरातून आयुर्वेद, होमिओपॅथी, योग आदी क्षेत्रातील अनेक मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेमध्ये आयुर्वेद तसेच इतर सर्व चिकित्सा पद्धतीमधून बऱ्याच नवीन संशोधकांनी भाग घेतला होता.
‘केशायुर्वेद’चे संस्थापक वैद्य हरीश पाटणकर यांनी डॉ. प्रिया गोखले यांच्यासह ‘जेएसपीएम’ संस्थेचे अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या समन्वयाने ‘पंचकर्मातील स्वेदन पेटी मधील तापमान नियंत्रक’ (Temperature Regulator in Steam Chamber used in Panchakarma Theatre) या संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रथम पारितोषिक मिळाले आहे. या संशोधनामुळे आयुर्वेदातील पंचकर्म या चिकित्सेत स्वेदन या कर्मासाठी शास्त्रीय पद्धतीने तापमान नियंत्रण करता येणार आहे. या अनोख्या संकल्पनेचा वापर सर्व आयुर्वेद चिकित्सक, महाविद्यालये व रुग्णालये यांना होणार आहे. या संशोधनात ‘जेएसपीएम’चे प्राचार्य डॉ. राजेंद्र कानपडे, संशोधन टीममधील डॉ. अनुजा गोखले, हलीमा शेख, ज्योती सातपुते, डॉ. शैलेश हंबर्डे आदींचे सहकार्य लाभले.
वैद्य पाटणकर हरिश हे आपल्या नवीन संशोधनासाठी नेहमीच ओळखले जातात. भारतातील पहिल्या आयुर्वेदिक हेअर टेस्टिंग लॅब व रिसर्च सेंटर असणाऱ्या ‘केशायुर्वेद’चे ते संस्थापक आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा केशरोगावरील संशोधनास दुबई येथे आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आजच्या या पुरस्काराने केशायुर्वेद व वैद्य हरिश पाटणकर यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.