देशहित, समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करा: मेजर जनरल के. के. चक्रवर्ती

देशहित, समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करा: मेजर जनरल के. के. चक्रवर्ती

 ‘एआयटी’ आयोजित ‘इनर्व्ह ९.०’ राष्ट्रीय हाकेथॉनचे विजेतेपद बंगळुरूच्या दयानंद सागर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला

पुणे: आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एआयटी) ओपन सोर्स सॉफ्टवेअर क्लबच्या वतीने आयोजित ‘इनर्व्ह ९.०’ या भारतातील सर्वात मोठ्या विद्यार्थी-प्रेरित राष्ट्रीय हाकेथॉनचे विजेतेपद बंगळुरू येथील दयानंद सागर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या संघाने यांनी पटकविले. विवेक अगरवाल, नमन पार्लेचा, भुवन एम., मोहित नागराज यांच्या संघाने ओपन इनोव्हेशन कॅटेगरीमध्ये लुमिनोसिटी प्रकल्प सादर केला. विजेत्या संघाला रोख १,२५,०००/- चे पारितोषिक व सन्मानपत्र देण्यात आले.

हाकेथॉनमध्ये आळंदी येथील एमआयटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगच्या पारस सातपुते व झांकी शहापूरे यांच्या ‘पीएडब्ल्यूएस’ संघाने द्वितीय, तर वाघोली येथील जीएच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या शाहिद शेख, अरमान काद्री, डोलार जैन, तरुण शिखवाल यांच्या स्टार्कटेक मावेरिक्स संघाने तिसरे पारितोषिक मिळाले. द्वितीय संघाला ७५ हजार, तर तृतीय संघाला ५० हजार रुपयाचे पारितोषिक मिळाले.

‘एआयटी’चे चेअरमन मेजर जनरल के. के. चक्रवर्ती यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण झाले. ‘एआयटी’च्या दिघी कॅम्पसमध्ये झालेल्या या सोहळ्यात ‘एआयटी’चे संचालक ब्रिगेडियर अभय भट, सहसंचालक कर्नल एम. के. प्रसाद, प्राचार्य डॉ. बी. पी. पाटील, ब्रिगेडियर राजीव सिंग, गौतम रेगे, क्लबच्या फॅकल्टी-इन्चार्ज प्रा. वैशाली इंगळे, प्रा. कुलदीप हुले आदी उपस्थित होते.
मेजर जनरल के. के. चक्रवर्ती यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, हाकेथॉनसारखे उपक्रम विचार, कल्पकता, इनोव्हेशन आणि टीम वर्कला चालना देते. अतिशय उत्तम पद्धतीने या हाकेथॉनचे आयोजन ‘एआयटी’च्या विद्यार्थी व शिक्षकांनी एकत्रितपणे केले. तंत्रज्ञान ही दुधारी तलवार आहे. त्यामुळे त्याचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठी व्हावा. देशहितासाठी तंत्रज्ञान वापरण्यासह समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा, असे त्यांनी नमूद केले.

ब्रिगेडियर अभय भट म्हणाले, “स्पर्धेत जिंकणे-हरणे यापेक्षा सहभागी होऊन नावीन्यतेचा अनुभव घेणे महत्वाचे आहे. ‘इनर्व्ह ९.०’ ही केवळ स्पर्धा नसून, युवा तंत्रज्ञांना उद्योग क्षेत्राचा अनुभव, मार्गदर्शन आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांना वाव मिळवून देणारे व्यासपीठ आहे. अशा उपक्रमातून आव्हान स्वीकारून समस्या समजून घेत त्यावर उपाय शोधण्याची प्रेरणा मिळते. विद्यार्थ्यांना करिअर अधिक चांगले घडवण्यासाठी हाकेथॉन उपयुक्त ठरेल.”

या हाकेथॉनला जोश सॉफ्टवेअर, उडचलो, क्लाउडफ्लेअर, अकॉप्स, सहाना सिस्टिम्स यांसारख्या उद्योग क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांचे सहकार्य मिळाले होते. उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील भागीदारी अधिक बळकट होण्यासाठी ही हाकेथॉन महत्वपूर्ण ठरली. स्पर्धकांनी वास्तविक समस्यांवर आधारित नाविन्यपूर्ण दृष्टिकोनातून उपायांचे सादरीकरण केले. भारतभरातील ९,५०० हून अधिक विद्यार्थी २,५०० पेक्षा अधिक संघांद्वारे सहभागी झाले होते. त्यातील ३१ संघ अंतिम फेरीत दाखल झाले होते.

ओपन सोर्स सॉफ्टवेअर क्लबचे विद्यार्थी सेक्रेटरी कौशल व्यास आणि दीपशिखा रावत यांच्या नेतृत्वात अन्य सहकाऱ्यांनी सदस्यांनी हाकेथॉन यशस्वी करण्यात परिश्रम घेतले. सोहेला कौर व अनमोल सिंग राठोड यांनी सूत्रसंचलन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *