पुणे : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव उमेश प्रमोद पवार यांची युवक काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता युवकांचे संघटन बळकट करण्याच्या दृष्टीने पवार यांच्यावर सोपवलेली जबाबदारी महत्वपूर्ण आहे. पवार यांच्याकडे पुरंदर, बारामती, इंदापूर, दौंड, जुन्नर, शिरूर या विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी असणार आहे. भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. यांनी नवीन नियुक्त्यांची यादी नुकतीच जाहीर केली.
उमेश प्रमोद पवार हे गेल्या १४ वर्षांपासून विद्यार्थी काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या माध्यमातून कार्यरत आहेत. विद्यार्थी काँग्रेसचे सचिव, उपाध्यक्ष म्हणून, तसेच युवक काँग्रेसचे सचिव, उपाध्यक्ष, प्रदेश सचिव म्हणून त्यांनी प्रभावी काम केले आहे. संघटनात्मक बांधणीमध्ये त्यांचा हातखंडा असल्याचे पाहून त्यांच्यावर आता पुणे जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. उमेश पवार हे आमदार संजय जगताप यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात.
या निवडीवर प्रतिक्रिया व्यक्त करत उमेश पवार म्हणाले, “काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणानुसारच आजवर कार्य केले आहे. आमदार संग्राम थोपटे आणि आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यात युवक काँग्रेस जोमाने काम करणार आहे. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला प्राधान्य देवून युवक काँग्रेसच्या माध्यमातून पक्षाची विचारधारा गावखेड्यातील जनतेपर्यंत पोहोचविण्याचा माझा प्रयत्न राहील.”