नोंदणी महानिरीक्षकपदी तुकाराम मुंडे यांची नेमणूक करावी

रोहन सुरवसे पाटील यांची मागणी; अनागोंदी कारभाराला चाप लावण्यासाठी कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची गरज

पुणे : वर्षाकाठी शासनाला ४५ हजार कोटींचे उत्पन्न देणाऱ्या दस्त नोंदणी विभागातील अनागोंदी कारभाराला चाप लावण्यासाठी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची नोंदणी महानिरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी केली. या मागणीचे निवेदन सुरवसे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवले आहे.
 
रोहन सुरवसे पाटील म्हणाले, “सध्या दस्त नोंदणी विभागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात सावळा गोंधळ होत आहे. या विभागाची जनतेप्रती शिस्त पूर्णतः बिघडलेली आहे. नोंदणी कार्यालयमध्ये सर्वत्र अव्यवस्था झालेली आहे. एजंटांचा सुळसुळाट वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांचे काम होत नाही. नोंदणी विभागामध्ये पुणे शहर व महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात नियमबाह्य पद्धतीने बोगस एनए ऑर्डर, बोगस भोगवटा प्रमाणपत्र जोडून हजारो दस्त नोंदवले आहेत. गोरगरीब जनतेची कोट्यावधी रुपयाची लुबाडणूक झाली आहे.”
 
“या सर्व बाबी उजेडात आणूनही संबंधित दुय्यम निबंधक, सह जिल्हा निबंधक पुणे शहर यांच्यावर भारतीय नोंदणी कायदा १९०८ चे कलम ८१ अन्वये गुन्हे दाखल होणे आवश्यक असताना, एकही गुन्हा दाखल झाला नाही. उलट अशा प्रवृत्तीला पाठबळ मिळत आहे. त्याचप्रमाणे ठाणे शहर अंतर्गत २७ गावातील कल्याण, डोंबिवलीचा अनाधिकृत बांधकामाचा प्रश्न प्रकरणी झालेले दस्त, तसेच सध्या वसई, विरार या भागातील बोगस एनए ऑर्डर द्वारे झालेले दस्त पाहता या प्रकरणाची व्याप्ती खूप मोठी आहे. पालघर जिल्यातील तत्कालीन जेडीआर उदयराज चव्हाण व त्यांचे सब रजिस्टार यांच्यावर कलम ८१ नुसार कारवाई होणे आवश्यक असताना, या बाबी कडे नोंदणी महानिरीक्षक व महसूल उपसचिव हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. नोंदणी विभागाला शिस्त आणायची असेल तर तुकाराम मुंडे यांच्यासारख्या शिस्तप्रिय अधिकाऱ्याला शासनाने त्वरित या विभागात नेमावे, जेणेकरून महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला न्याय मिळेल,” असेही सुरवसे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *