‘सूर्यदत्त सूर्यभारत महोत्सव २०२३-२४’मध्ये शंतनू गोखले, अजिंक्य जोशी व एस. आकाश यांचे बहारदार वादन
पुणे : संतूर आणि तबलावादनाची मनोहारी जुगलबंदी… या जुगलबंदीला सुमधुर स्वरांच्या बासरीची मिळालेली साथ… संतूर, तबला आणि बासरी यांच्या त्रिवेणी संगमाने रंगलेली ‘सुरेल संध्या’ मैफल! निमित्त होते, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने सरत्या वर्षाला निरोप व नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी खास ‘सूर्यदत्त सूर्यभारत महोत्सव २०२३-२४’ या उपक्रमाचे! ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या संकल्पनेतून या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सूर्यदत्त सूर्यभारत महोत्सवात नववर्षानिमित्त ‘सुरेल संध्या’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संतूरवादक शंतनू गोखले, तबलावादक अजिंक्य जोशी आणि बासरीवादक एस. आकाश या तिघांच्या बहारदार वादनातून साकार झालेल्या ‘सुरेल संध्या’ कार्यक्रमाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. शंतनू गोखले आणि अजिंक्य जोशी यांची संतूर व तबला जुगलबंदी मनाला भुरळ घलणारी होती, तर एस. आकाश यांनी सुमधुर बासरीवादनातून रसिकांना कृष्णदर्शन घडवले. या संगीतरम्य संध्याकाळी उपस्थित सर्वांच्या चेहऱ्यावर सुरमयी भाव प्रकटताना दिसत होते. प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या हस्ते तीनही कलाकारांचा ‘सूर्यदत्त सूर्यभारत सन्मान २०२३’ देऊन गौरव करण्यात आला. सुवर्णपदक, फॅशन डिझाईनच्या विद्यार्थ्यांनी बनवलेले खास स्कार्फ, पुस्तक, सन्मानचिन्ह असे या सन्मानाचे स्परूप होते.
‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमध्ये झालेल्या या सोहळ्यात ऑल ‘सूर्यदत्त’च्या सल्लागार मंडळाचे सदस्य प्रसन्न पाटील, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. प्रीती काळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे नीलकंठ बजाज, प्रसिद्ध निवेदक किशन शर्मा, ‘सूर्यदत्त’चे कार्यकारी संचालक अक्षित कुशल,सूर्यदत्त कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या प्राचार्य डॉ. सिमी रेठरेकर, सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य किरण राव, सूर्यदत्त पब्लिक स्कुलच्या मुख्याध्यापिका वंदना पांडे, प्रा. अतुल देशपांडे आदी उपस्थित होते.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “आजच्या या सुरेल मैफलीने आपल्या सर्वांची सायंकाळ आनंदमय व स्वरमय झाली. नवीन वर्षाच्या निमित्ताने आयोजित सुरेल कार्यक्रमातून तिघांनीही बहारदार वादन केले. सांगीतिक कार्यक्रमातून आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारत असते. कलेला प्रोत्साहन देण्याची, कलेचा आदर करण्याची संस्कृती सूर्यदत्तने सुरवातीपासूनच जोपासली आहे.”
शंतनू गोखले म्हणाले, “प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या प्रेमामुळे आपल्या सर्वांसमोर वादन करण्याची संधी मिळाली. पहिल्या भेटीत चोरडिया यांनी आमच्या वादनाचा कार्यक्रम सूर्यदत्तमध्ये आयोजित करण्याचे वचन दिले होते. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने दिलेले हे वचन त्यांनी आज पूर्ण केले आहे.” सूत्रसंचालन प्रशांत पितलिया यांनी केले.
सूर्यभारत महोत्सवातून आनंदाची अनुभूती
“सूर्यदत्त सूर्यभारत महोत्सवाची सुरुवात २५ डिसेंबर रोजी दिल्ली येथे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना अटल मेमोरियल या ठिकाणी सुमनांजली वाहून करण्यात आली. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया उपस्थित होते. संध्याकाळी महामानव पंडित मदन मोहन मालवीय यांच्या १६२ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विज्ञानभवन, नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात पंडित मदन मोहन मालवीय यांच्या संकलित कार्याच्या ११ खंडांच्या पहिल्या मालिकेचे प्रकाशन केले. महोत्सवात ‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमध्ये दत्तजयंती सोहळा साजरा करण्यात आला. मुळशी तालुक्यातील सरपंचांचा सन्मान करण्यात आला. दिव्यांगाना कॅलिपर्स वाटप, कॅन्सर तपासणी व जनजागृती, नेत्ररोग तपासणी, हृदयरोग, मधुमेह तपासणी शिबीर घेण्यात आले. नरेंद्र नासिरकर यांचा ‘अटल नमो स्वरयात्रा’ हा विशेष कार्यक्रम झाला. जनसेवा फाऊंडेशनला भेट देत विद्यार्थ्यांनी रजई वाटप केले. तसेच विद्यार्थ्यांना गेल्या दशकामध्ये बदललेला भारत व भारताची अर्थव्यवस्था, पर्यटन, विविध व्यवसाय इत्यादींवर झालेला परिणाम याबाबत चित्रकला, निबंध लेखन, पत्रलेखन सादर करण्याच्या प्रकल्पाचे आयोजन केले गेले,” असेही प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.