पुणे: हजारो दिव्यांच्या लखलखत्या प्रकाशाने चतुःशृंगी मंदिराचे (chaturshrungi temple) प्रांगण शुक्रवारी उजळून निघाले. त्रिपुरी पौर्णिमेचे औचित्य साधून नवचैतन्य हास्ययोग परिवार व चतुःशृंगी देवस्थान समितीच्या संयुक्त विद्यमाने भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. चतुःशृंगी मंदिराच्या प्रांगणात रचनात्मक पद्धतीने प्रज्वलित केलेल्या दिव्यांचा लखलखाट पाहायला मिळाला. आनंदी व हास्यमय जीवन जगण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
येत्या २२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत असलेल्या ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ या मराठी व हिंदी चित्रपटाचे नायक अनुपसिंग ठाकूर, निर्माते केतनराजे भोसले (ketanraje bhosale) व टीमने या दीपोत्सवाला उपस्थिती लावली. दीपोत्सवावेळी नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे संस्थापक विठ्ठल काटे, मुख्य समन्वयक मकरंद टिल्लू, उपाध्यक्ष विजयराव भोसले, सचिव पोपटलाल शिंगवी, हरीश पाठक, जयंत दशपुत्रे, प्रमोद ढेपे यांच्यासह नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे सदस्य व मंदिर देवस्थानाचे विश्वस्त श्रीकांत अनगळ, नंदकुमार अनगळ, सुहास अनगळ, डॉ. विनायक देडगे, पराग पोतदार, किशोर सरपोतदार, स्वाती महाळंक, चैताली माजगावकर भंडारी, आदी उपस्थित होते.
अनुपसिंग ठाकूर (Anup Singh Thakur) म्हणाले, “मागील वर्षी मी चतुःश्रृंगी मातेचे दर्शन घेतले आणि मला या चित्रपटाची संधी मिळाली. आईच्या दर्शनासाठी पुढच्या वर्षी पुन्हा येईन. छत्रपती संभाजी महाराजांसारख्या महापुरुषाची भूमिका साकारायला मिळणे, हा मातेचा आशीर्वाद आहे. नवचैतन्य हास्ययोग परिवार खूप चांगले काम करत आहे. मला या परिवाराचा आणि तुम्ही केलेल्या कामाचा हेवा वाटतो.”
मकरंद टिल्लू म्हणाले, “आम्ही गेल्या अकरा वर्षांपासून हा दीपोत्सव करतो. या माध्यमातून आम्ही सर्व ज्येष्ठांना व तरुणांना हास्यमय जीवन जगण्याचा संदेश देतो. या परिवारामध्ये पंचवीस हजाराहून अधिक ज्येष्ठ नागरिक सहभागी आहेत. या दीपोत्सवाच्या माध्यमातून ताण-तणावाच्या अंध:कारातून बाहेर पडण्यासाठी आपण हास्याचे दिवे प्रज्वलित करूया आणि सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद पेरूया.”
दीपोत्सवाचे आरेखन विजयराव भोसले यांच्या संकल्पनेतून केले होते.