विद्यार्थी सहायक समितीच्या माजी विद्यार्थ्यांतर्फे आष्टी व शिरूर कासार तालुक्यात वृक्षारोपण

विद्यार्थी सहायक समितीच्या माजी विद्यार्थ्यांतर्फे आष्टी व शिरूर कासार तालुक्यात वृक्षारोपण

आशीर्वाद वृक्ष उपक्रमातून पर्यावरण संवर्धन : जमीर शेख
विद्यार्थी सहायक समितीच्या माजी विद्यार्थ्यांतर्फे आष्टी व शिरूर कासार तालुक्यात वृक्षारोपण
 
पुणे : “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुण्यात शिक्षणासाठी आधार देण्यासह झाडे लावून परिसर हिरवागार करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या विद्यार्थी सहायक समितीचे आणि त्यांच्या माजी विद्यार्थ्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. समितीच्या माजी विद्यार्थ्यांमार्फत राबविण्यात येत असलेल्या या आशीर्वाद वृक्ष उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धन होत आहेच; शिवाय लोकांमध्ये झाडांबद्दल आपुलकीची भावनाही निर्माण होत आहे,” असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी जमीर शेख यांनी केले.
 
विद्यार्थी सहायक समितीच्या माजी विद्यार्थी मंडळाच्या आशीर्वाद वृक्ष उपक्रमात कल्याणी टेक्नोफोर्ज यांच्या सहकार्यातून बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील वारणी जिल्हा परिषद शाळेत ४० समिती आशीर्वाद वृक्षांचे लोखंडी सुरक्षा जाळीसह वितरण झाले. यातील काही झाडे शाळेत तर उर्वरित झाडे परिसरात लावली जाणार आहेत. 
 
समितीचे माजी विद्यार्थी सुनील चोरे, गणेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी व शिरूर कासार येथील सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन जायभाये यांनी पुढाकार घेतला. यावेळी १९८७-९१ बॅचचे माजी विद्यार्थी काशिनाथ जगताप, शिरूर कासार पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश बढे, वारणी गावचे उपसरपंच ज्ञानदेव केदार, शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन दिलीप जायभाये, केंद्रप्रमुख शिवाजी भोंडवे, शाळेचे मुख्याध्यापक परशुराम खेडकर, मुख्याध्यापक राजेंद्र केदार यांच्यासह इतर अधिकारी, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. या भागातील समितीचे माजी विद्यार्थी वैभव राऊत, सपना नागरगोजे, राहुल सातपुते, देविचंद आंधळे, प्रतीक भंडारे, ओंकार भांडेकर, सचिन पोकळे यांनी आशीर्वाद वृक्षांचे पालकत्व घेतले.
 
प्रा. सचिन जायभाये म्हणाले, “आष्टी आणि शिरूर कासार तालुक्यातील अनेक विद्यार्थी समितीमध्ये राहून शिकले. समितीने दिलेल्या संस्कारांमुळेच या उपक्रमांतर्गत राज्यातील विविध गावांमध्ये समितीच्या माध्यमातून आशीर्वाद वृक्ष लावले जात आहेत. समितीच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाबरोबरच पुढील पिढ्याना प्रेरणा मिळावी,तसेच शुद्ध हवा, सावली आणि फळे मिळावीत, यासाठी हा उपक्रम महत्वाचा आहे. ग्रामीण भागातील मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी समिती एखाद्या वृक्षाप्रमाणे आधार देते. या भागातील विद्यार्थ्यांना कोणतीही मदत लागली, तरी समितीचे माजी विद्यार्थी म्हणून आम्ही करत राहू. शाळांमधून वृक्षारोपणाची जागृती झाली, तर भविष्यात आपला परिसर हिरवागार होईल.”
 
आशीर्वाद वृक्ष उपक्रम हा अतिशय महत्वाचा असून, देणगीदारांच्या देणगीतून सुरक्षा जाळीसह वृक्षारोपण केले जात आहे. प्रत्येक रोपाला अनुक्रमांक देऊन त्यावर देणगीदार व समितीच्या नावाचा उल्लेख असणार आहे. या झाडांच्या संगोपनासाठी विद्यार्थ्यांना आर्थिक मदत पुरविली जात आहे. कडुनिंब, चिंच, पिंपळ, वड, करंज अशा देशी रोपांची लागवड केली जात आहे. त्यात्या गावातील देणगीदारांना, युवकांना या मॉडेलमधून प्रोत्साहन मिळावे आणि अशाच धर्तीवर उपक्रम करत आपले गाव हरितग्राम करावे हीदेखील उपक्रमाची संकल्पना असल्याचे समितीच्या वतीने माजी विद्यार्थी जीवराज चोले यांनी नमूद केले. प्रशांत खेडकर यांनी सूत्रसंचालन केले. खाडे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *