परमपूज्य स्वामी श्री गोविंददेव गिरी महाराज यांना ‘सूर्यरत्न – द सेंट ऑफ मॉडर्न इंडिया’ पुरस्कार प्रदान

परमपूज्य स्वामी श्री गोविंददेव गिरी महाराज यांना ‘सूर्यरत्न – द सेंट ऑफ मॉडर्न इंडिया’ पुरस्कार प्रदान

पुणे : अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष परमपूज्य स्वामी श्री गोविंददेव गिरी महाराज यांना ‘सूर्यदत्त सूर्यरत्न राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार – द मॉडर्न सेंट ऑफ इंडिया’ देऊन शनिवारी सन्मानित करण्यात आले. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या २६ व्या वर्धानपनदिनानिमित्त ‘सूर्यदत्त’तर्फे हा पुरस्कार सन्मानपूर्वक मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. 
 
 
तीर्थक्षेत्र आळंदी येथे गीता परिवार ट्रस्टतर्फे आयोजित आठ दिवसीय सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संमेलन ‘गीता भक्ती अमृत महोत्सव २०२४’ या कार्यक्रमात जगभर वेद आणि भारतीय प्राचीन संस्कृतीचा प्रसार करण्यात स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘सूर्यदत्त’च्या वतीने सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, भगवदगीता देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वामीजींना प्रदान करण्यात आला. 
 
यावेळी आचार्य राजेंद्र दास, आचार्य अभय दास, एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, संयोजक संजय मालपाणी आणि गिरीधर काळे, आळंदी येथील वारकरी संप्रदायाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. ‘सूर्यदत्त’च्या सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, डॉ. किमया गांधी, मुख्य संचालन अधिकारी अक्षित कुशल, संचालक (सीएसआर) प्रशांत पितालिया, रोशनी जैन, नयना गोडांबे, रोहित संचेती, मारुती मारेकरी व नितीन कामताने उपस्थित होते. तीर्थक्षेत्र आळंदी येथे इंद्रायणी तीरावर हजारो विद्यार्थ्यांचे गीता पठण, मृदंग वादनाच्या सानिध्यात हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला.
 
यावेळी प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी पुरस्कार प्रदान करण्यामागील भूमिका स्वामीजींसमोर मांडली. देशासाठी स्वामीजींचे कार्य महान असून, अध्यात्मिक व सांस्कृतिक प्रगतीमध्ये त्यांनी केलेले कार्य समाजासाठी दिशादर्शक आहे. श्रीराम मंदिराच्या उभारणीत महाराजांनी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करताना सूर्यदत्त परिवाराला त्यांचा आशीर्वाद मिळाल्याची भावना आम्हा सर्वांच्या मनात आहे. ‘सूर्यदत्त’ विद्यार्थ्यांमध्ये संस्काराची बीजे पेरत असून, स्वामीजींच्या आशीर्वादाने आणखी ऊर्जा मिळाल्याचे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.
 
स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी पुरस्काराचा स्वीकार करत सूर्यदत्त संस्थेच्या कार्याला आशीर्वाद दिले. भारतीय संस्कृती, परंपरा महान असून, भविष्यात संपूर्ण जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता भारतामध्ये आहे. आपली मूल्ये, संस्कृती भावी पिढीने जपायला हवीत. त्यातूनच एका आदर्श पिढीचे निर्माण होणार आहे, अशी भावना महाराजांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *